Voting Machine
Voting Machine 
राज्य

यावेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘परिषद’ ताकदीने उतरणार !

अतुल मेहेरे

नागपूर : अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा आज झाली. त्यानंतर आधीपासूनच सुरू झालेल्या मोर्चेबांधणीला अधिक वेग आला आहे. सध्या शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. शिक्षक मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. पण भाजप पुरस्कृत महाराष्ट्र शिक्षक परिषद यावेळी संपूर्ण ताकतीनिशी निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्यामुळे यावेळची लढत लक्षवेधी राहणार आहे, हे निश्‍चित. 

आठ ते १० संघटना आणि अपक्ष मिळून जवळपास २० उमेदवार मैदानात उतरतील, असे सध्यातरी दिसतेय. यामध्ये शिक्षक महासंघाचे शेखर भोयर आणि शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे हे दोघेच यावेळी पुन्हा निवडणूक लढतील. उर्वरित सर्व उमेदवार नवीनच राहण्याची शक्यता अधिक आहे. अमरावतीमधून केवळ एकच महिला राहणार असल्याचीही माहिती आहे. गेल्या निवडणुकीत मतदारसंघातील पाचही जिल्हे मिळून यवतमाळातून एक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होती. तेच चित्र कदाचित यावेळीही असेल. शिक्षक आघाडी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षण संघर्ष समिती, शिक्षक महासंघ, शिक्षक भारती, राज्य शिक्षक संघ, विज्युक्टा, नुटा आणि आयटीआय निदेशक संघटना यांचे उमेदवार राहतील. यांपैकी राज्य शिक्षक संघ, विज्युक्टा, नुटा आणि आयटीआय निदेशक संघटना यांची मते फार नाहीत, पण नेटवर्क चांगले असल्याचा फायदा त्यांना होणार आहे. 

२०१४ ला झालेल्या निवडणुकीत राज्य शिक्षक संघ, विज्युक्टा, नुटा आणि आयटीआय निदेशक संघटना यांनी कुणालाही पाठींबा दिला नव्हता. आपल्या सदस्यांना त्यांच्या मनाने मतदान करण्याची मुभा दिली होती. पण यावेळी या चार संघटनांचा मिळून एक उमेदवार मैदानात राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या निवडणुकीत ४२ हजार मतदार होते. यावेळी आत्तापर्यंत पाचही जिल्हे मिळून ३३,००० मतदारांची नोंदणी झाली आहे. ही संख्या फार फार तर ३५ हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या संख्येने शिक्षक निवृत्त झाले आहेत. 

शिक्षक परिषद उतरणार संपूर्ण शक्तिनिशी ः शिवराय कुणकर्णी
अमरावती शिक्षक मतदारसंघ एके काळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा गड होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये तीन टर्म शिक्षक संघ आणि त्यानंतर गेल्या वेळी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे आमदार झाले. यावेळीही शिक्षक आघाडी लढणार आहे. परिषदेने यावेळची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण गेल्या तीन टर्म पासून या मतदारसंघात परिषदेला यश आलेले नाही. यावेळी ते यश खेचून आणायचे असेल तर चिन्हावर लढण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत आणि यावेळी मतदार नोंदणीही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला पुरक अशीच झाली असल्याची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT