पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटातून सावरण्यासाठी आता तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यात तेल, मीठ, तांदूळ, गहू, साखर, डाळ या वस्तूंचा समावेश असून हातावर पोट असणारे मजूर, निराधार आणि गोरगरिबांना या माध्यमातून मोठा आधार मिळणार आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून ५००० तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १०००० अशा एकूण १५ हजार जीवनाश्यक वस्तूच्या संचाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा जिल्हा परिषदेचे मार्गदर्शक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली असून अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात ५००० जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या संच वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे. मंदिर समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंढे यांच्या मान्यतेने आवश्यक साहित्याची खरेदी प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देणे अत्यंत निकडीचे आहे. त्यामुळे सर्व प्रक्रियेबाबत जि.प.अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्याशी चर्चा झाली असून याबाबत तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.अरविंद कुमार यांना देखील याबाबत अवगत करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात कोरोना सहाय्यता कक्ष व नागरी भागात तत्सम यंत्रणेचे याकामी सहकार्य घेतले जाईल. संबंधित यंत्रणांनी योग्य ते निकष लावून गरजू नागरिकांपर्यंत जलद गतीने मदत पोहोचविण्यासाठी काटेकोर नियोजन करावे असे आवाहनही आमदार श्री. पाटील यांनी केले आहे.
(Reader connect innitative)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.