Pravin Darekar at Center Point
Pravin Darekar at Center Point 
राज्य

उद्धवजींनी आंदोलकांना आवरण्यापेक्षा कोरोनाला आवरावे : प्रवीण दरेकर

अतुल मेहेरे

नागपूर : वाढीव वीजबिल आणि १०० युनिट वीजबिल माफ करणे आणि इतर मुद्यांवरून भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात आंदोलने केल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असल्यामुळे ‘तुमच्या आंदोलकांना आवरा’, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यावर उद्धवजींनी आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कोरोनाला आवरावे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना आज दिला. 

दरेकर म्हणाले, नैसर्गिक युती तोडून शिवसेना अनैसर्गित युती करून सत्तेवर आली. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस ही अभद्र युती आहे. तीन चाकाची सरकार सत्तेत आली तर आली. पण कारभार तरी नीट चालवावा, पण तेही होत नाहीये. राज्यात समस्या नसत्या, जनता त्रस्त नसती तर आम्हीदेखील कशाला रस्त्यांवर उतरून आंदोलने केली असती? सरकार आम्हाला रस्त्यांवर उतरण्यासाठी भाग पाडतेय. त्यामुळे उद्धवजींनी पंतप्रधानांना विनंती करण्यापेक्षा आपली कामे नीट करावी. 

पदवीधरांच्या नोकरीसाठी भाजपचा प्लॅटफॉर्म 
वर्षभराच्या कार्यकाळात महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, आश्वासन देऊन मोफत वीज दिली नाही, शाळा सुरू करायच्या की नाही हे ठरवू शकले नाही. ते सरकार पदवीधरांना काय न्याय देणार, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपतर्फे पदवीधरांना निश्चित कालावधीत नोकरी देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. तसेच ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना बँकेमार्फत अर्थपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी ते नागपूरला आले होते. ते म्हणाले जोशी यांच्या कार्याविषयी वेगळे सांगायची गरज नाही. 

महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली विकास कामे तसेच नागपूर सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून त्यांच्या नेतृत्वाची क्षमता सर्वांनीच बघितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आणि विद्यमान महाआघाडीचा वर्षभराचा निष्क्रिय कार्यकाळ बघता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक तुम्ही विकासासोबत आहात की नाही हे ठरवणारी आहे,असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार मिलिंद माने, रिपाईचे राजन वाघमारे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. 

काँग्रेस लाचार 
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किंमत देत नाही. शिवसेनेचा मंत्री असल्याने परिवहन विभागाला हजार कोटींचे पॅकेज दिले मात्र ऊर्जा खाते काँग्रेसकडे असल्याने शंभर युनिटपर्यंत वीज माफीचा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र सत्तेत राहायचे असल्याने काँग्रेस लाचार झाली आहे. 

राष्ट्रवादीच लाभार्थी 
महाआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी आहे. सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याचकडे आहेत. निर्णयसुद्धा अजित पवार हेच घेतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल असे ठासून सांगितल्या जात आहे. मात्र महाघाडीत अंतर्गत विसंवाद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे सरकार केव्हाही कोसळू शकते, असेही दरेकर यांनी सांगितले.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT