Sanjay Rathod - meeting doctors
Sanjay Rathod - meeting doctors 
राज्य

‘कोरोनाच्या संकटात एकजूट महत्वाची, डॉक्टरांनी जनतेचे हित बघावे’

राजकुमार भितकर

यवतमाळ : जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन त्यांनी मागे घ्यावे, यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी केलेला प्रयत्नही वाया गेला आहे. कोरोना रुग्णांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे आता काही सामाजिक संघटनांसह नागरिकांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भानगडी कराव्या, पण लोकांचे जीव जाऊ नये, म्हणून सामान्य लोक पुढे सरसावले आहेत. 

विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री राठोड म्हणाले, जिल्ह्यात गत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिका-यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे. कोरोनाचे संकट अतिशय गंभीर असून आजच्या परिस्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. पण डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. 

विश्रामगृहात जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे,  बांधकाम सभापती राम देवसरकर, समाजकल्याण सभापती विजय राठोड, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात शासन-प्रशासन तसेच गावपातळीवरील सर्व यंत्रणा अतिशय जोमाने लढत आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या आपात्कालीन परिस्थितीत जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्वांची एकजूट असणे आवश्यक असून वैद्यकीय अधिका-यांच्या शिष्टमंडळाची दुपारी चर्चा करण्यात आली. 

प्रशासन व आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा आपला प्रयत्न आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांपैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. केवळ जिल्हाधिका-यांच्या बदलीवरच वैद्यकीय अधिका-यांनी ठाम न राहता जनतेचे हित लक्षात घेऊन उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन शिष्टमंडळाला केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, संपूर्ण यंत्रणा तसेच ग्रामपातळीवरील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींच्या अथक प्रयत्नामुळेच सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यु नव्हता. 

सर्वांच्या प्रयत्नाने जिल्हा नियंत्रणात होता. आताही इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी चांगलीच आहे. याचे संपूर्ण श्रेय येथील सर्व यंत्रणांना जाते. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही जनमोहीम करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सर्वांची एकजूट असावी. वैद्यकीय अधिका-यांच्या बैठका यापुढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात घेण्यासाठीसुध्दा नियोजन करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले असून विभागीय आयुक्तांनीसुध्दा डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. 

संपूर्ण यंत्रणा युध्दजन्य परिस्थतीसारखा कोरोनाचा सामना करीत असून त्यासाठी काही मतभेद झाले असतील तर ते नक्कीच सोडविण्यास येतील. मात्र नागरिकांचा विचार करून डॉक्टरांनी आपली सेवा बजावावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच येत्या काही दिवसांत रेमडीसीवर इंजेक्शन जिल्ह्यात शासकीय दरातच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय दरात ते उपलब्ध होण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. 
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT