नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज (ता. १६) निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची अध्यक्षपदी तर, उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नावाववर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडुन दोघांच्याही नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोघांनी उमेदवार अर्ज दाखल केले. मात्र विरोधात अर्जच न आल्याने अध्यक्षपदी वसंत चव्हाण यांची तर उपाध्यक्ष पदी हरिहर भोसीकर यांची बिनविरोध निवड करण्या्त आली.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला होता. काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन्ही पक्षांनी यश मिळवत भाजपच्या पॅनलचा पराभव केला. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने भाजपच्या पॅनलचा पराभव करत बॅंक ताब्यात घेतली.
आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. तत्पुर्वीच अशोक चव्हाण यांनी आमदार वसंत चव्हाण व राष्ट्रवादीचे हरिहर भोसीकर यांची अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित केली होती. परंतु या दोघांच्याही विरोधात कुणीच अर्ज दाखल न केल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
चव्हाणांचे पुनर्वसन..
नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत चव्हाण हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. वसंत चव्हाण यांनी गावच्या सरपंच पदापासून जिल्हापरिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, नायगाव मार्केट कमिटी चेअरमन, आणि आता नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद मिळवत आपला राजकीय आलेख चढता ठेवला आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडीमुळे माजी आमदार वसंत चव्हाण यांचे पूनर्वसन झाले आहे. शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विद्यमान जिल्हा अध्यक्ष हरीहर भोसीकर यांना देखील जिल्हा बँकेच्या रुपाने चांगले पद मिळाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा टिकाव लागणार नाही, हे स्पष्ट असल्याने भाजपकडून कुणीच अर्ज भरला नाही. गेल्यावेळी सत्ताधारी असलेल्या भाजपवर यावेळी मात्र अलिप्त राहण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.