Vikrant Patil
Vikrant Patil  Sarkarnama
राज्य

`नितीन राऊतांनी मुलासाठी महावितरणची यंत्रणा कामाला लावली..`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे (Nitin Raut) चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची (MSEB) यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जामंत्री राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी केली आहे. ते भाजपा (BJP) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.7 डिसेंबर) बोलत होते. यावेऴी आमदार आशीष शेलार, (Ashish Shelar) भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) उपस्थित होते.

पाटील यांनी यावेळी नवी मुंबईत वाशी येथे सोमवारी (ता.6 डिसेंबर) महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच, कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी 'वरून दबाव' आहे तसेच, या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस तर, मदत न केल्यास त्याचेही फळही मिळेल अशा भाषेत महावितरणचे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते, असे त्यांचे म्हणने आहे. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब ही विचारला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजीवांना निवडणुकीत कसे साह्य करायचे याची टिपणे आढळून आली आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटीलांनी सांगितले की, वाशी येथील घटनेतून महावितरण ची यंत्रणा ऊर्जामंत्री राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT