राज्य

हवा पाहून मी राजकारण करत नाही - विलास मुत्तेमवार

सरकारनामा ब्युरो

नागपूर : काही नेते पक्षाची हवा पाहून राजकारण करतात. मी कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाच्या कठीण काळातही साथ सोडली नाही. "हवा पाहून तिवा मांडणारा' मी नेता नाही, अशा शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेल्यांवर हल्लाबोल केला. 
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाल्यानंतर नागपूर लोकसभा मतदारसंघातून विलास मुत्तेमवार यांच्याशिवाय भाजपतून नुकतेच कॉंग्रेस प्रवेश केलेले माजी आमदार आशीष देशमुख व माजी खासदार नाना पटोले यांनीही नागपूरवर हक्क सांगितला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाची मुंबईत उद्या (ता. 16) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. नागपूर लोकसभेसाठी अनेकजण इच्छुक असून यात भाजपतून नुकतेच आलेले माजी आमदार आशीष देशमुख व माजी खासदार नाना पटोले यांचाही समावेश आहे. 
या संदर्भात विचारणा केली असता "सरकारनामा'शी बोलताना मुत्तेमवार म्हणाले, पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावयाची याचा निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेत असते. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी करण्याचा या बैठकीचा उद्देश आहे. या स्पर्धेत काही हौसे-नवसेही उतरले आहेत. ज्या पक्षाची हवा आहे, त्या पक्षात जाण्याची त्यांची परंपरा असते. हवा पाहून तिवा मांडणाऱ्यांपैकी मी नाही. यावेळी त्यांनी आशीष देशमुख व नाना पटोले यांचे नाव घेण्याचे मात्र टाळले. 

इंदिराजींच्या कठीण काळात आम्ही पक्षाच्या सोबत राहिलो. त्यावेळी सर्वांनी इंदिराजींची साथ सोडली होती. त्यावेळीही कॉंग्रेस पक्ष नामशेष करू अशा वल्गना केल्या जात होत्या. तरीही आम्ही इंदिराजींच्या पाठीशी राहिलो व पुन्हा कॉंग्रेसला सत्तेत आणले. आताही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले काहीजण भारत कॉंग्रेस मुक्त करण्याच्या गमजा मारत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भरवशावर कॉंग्रेस पक्ष टिकला आहे. उमेदवारी माझ्यासाठी महत्त्वाची नाही. उमेदवारी मिळाली नाही तरी कॉंग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT