Amarsaih Pantit & Vilasrao Deshmukh beed news
Amarsaih Pantit & Vilasrao Deshmukh beed news 
राज्य

विलासरावांची बीडमध्ये प्रचारासाठी शेवटची सभा आणि शिवछत्रवर भेट..

दत्ता देशमुख

बीड : ज्या आजोळाच्या जिल्ह्यात दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे बालपण गेले. त्यांच्या आयुष्यातला शेवटचा सार्वजनिक कार्यक्रमही त्याच बीड जिल्ह्यात झाला. दिलीपराव देशमुख यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या विलासराव देशमुख यांनी जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या शिवछत्र निवासस्थानी भेट दिली.विलासराव देशमुख यांचे बीड जिल्ह्याशी घनिष्ठ नाते संबंध होते, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचेही देशमुख कुटुंबियांशी जिव्हाळा होता. कारण, सुधारकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात विलासराव देशमुख व शिवाजीराव पंडित यांनी सोबत काम केल्याने हे ऋणानुबंध घट्ट झाले होते. 

दरम्यान, २०१२ सालच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिलीपराव देशमुख काँग्रेसचे उमेदवार होते. वास्तविक मतदार संघात राष्ट्रवादीच्या मतांची संख्या काँग्रेसहून अधिक होती आणि त्यात बीडची संख्या अधिक असल्याने ही जागा काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादीला सोडावी असाही मतप्रवाह होता. अगदी बीडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सय्यद सलिम यांनी उमेदवारीही दाखल केली होती. पण, शेवटी ही जागा विलासराव देशमुख यांच्यामुळे काँग्रेसला सुटून दिलीपरावांनाच उमेदवारी मिळाली.

त्यावेळी विलासराव देशमुख केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री होते. बीडमधील राष्ट्रवादीच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून त्यांनी बीडला प्रचार सभा घेण्याचा निर्णय घेतला. २० मे रोजी त्यांचा दौरा निश्चित झाला. मात्र, प्रचारासाठी येणाऱ्या विलासरावांनी घरी यावे, अशी त्यांचे तत्कालिन सहकारी शिवाजीराव पंडित यांची भावना होती.

अमरसिंह पंडित यांनी विलासरावांना संपर्क साधून घरी येण्याची विनंती केली. त्यावर काहीच आढेवेढे न घेता विलासरावांनी दिलीपराव देशमुख यांच्यासह शिवाजीराव पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी भेट दिली. तिथे शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित आदींनी त्यांचे यथोचित स्वागत केले. भोजनानंतर दोन तास गप्पांचा फडही रंगला. मग यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सभा झाली. त्यांच्या आयुष्यातली ही शेवटची सार्वजनिक सभा ठरली.

खळे - दळे खात्याची आठवण

एकेकाळी मंत्रीमंडळातील सहकारी असलेले विलासराव व शिवाजीराव पंडित यांच्या भेटीत खुमासदार किस्से रंगले. राजेश्वर चव्हाण यांनी भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात दोघे मंत्री असतांना विलासराव बीडच्या दौऱ्यावर होते.

त्यावेळी राज्यमंत्री असलेले शिवाजीराव पंडित दौऱ्यात गैरहजर होते. त्यामुळे विलासराव देशमुख यांनी चौकशी केली तर कोणीतरी सांगितले ‘शिवाजीराव खळ्यावर गेले’. त्यावर हजरजबाबी विलासराव यांनी आता ‘खळे - दळे’ हे नवीन खाते सुरू करावे लागेल असा चिमटा काढला होता. त्याची आठवण काढून दोघे खूपवेळ हसले होते. या भेटीत घोडे, घर, शेती यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT