balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg 
राज्य

आमचं मस्त चाललंय, विरोधकांनी चिंता करू नये : थोरात

गाैरव साळुंके

श्रीरामपूर : "विरोधकांना कार्यकत्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रत्येक भाषणाचा शेवट सरकारविरोधी बोलून करावा लागतो. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे, ही विरोधकांची जबाबदारी आहे. मात्र, पूर्वीच्या सरकारपेक्षा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले सुरू आहे. विरोधकांनी सरकारची काळजी करू नये. आमचे काम मस्त चाललेय," असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार निर्माण करणे, हा एक वेगळा प्रयोग होता. त्यासाठी प्रारंभी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तयार नव्हत्या. शेवटी विचारसरणीचा प्रश्न होता; मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली. सरकार आल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत कोरोना संकट होते. धारावीतील कोरोना संसर्ग रोखणे सोपे नव्हते. त्यानंतरही अनेक संकटे आली.

सरकारची वाटचालच अडचणीतून सुरू झाली. विकास कामांसाठी पैसा कमी पडला. त्यात केंद्राकडून जीएसटीचे ३० हजार कोटी थकले. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार सज्ज आहोत.'

थोरात म्हणाले, "सध्या अनेक शहरांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालयाची स्थिती पूर्वीसारखी होत आहे; परंतु कोरोना संकटाशी सरकारने अत्यंत यशस्वीपणे सामना केला. पुन्हा लॉकडाउन होणार का, असा प्रश्न विचारला जातो; परंतु प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून प्रशासन योग्य तो निर्णय घेत आहे. तसेच, लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे; मात्र पाहिजे तेवढी लस तयार होत नसल्याने लसीकरण वाढविणे, रुग्णांवर उपचार करण्यावर सरकार लक्ष देत आहे."

"कोरोनासाठी केंद्राने सप्टेंबरपर्यंत मदत केली. त्यानंतर पथके पाठवून काळजी घेण्याच्या सूचना केल्या. सरकारकडून झालेल्या चुका दाखवा; परंतु आपणही काळजी घेणे गरजेचे आहे. एका गावाची निवड करून नवीन वीजयोजना राबविली जाणार आहे. त्यातून त्याचे महत्त्व कळणार आहे," असे मंत्री थोरात यांनी सांगितले.

"हिरण यांच्या हत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यामध्ये पोलिसांनी विशेष लक्ष घातले असून, पुढील तपास योग्य प्रकारे करावा. आरोपींवर कठोर कारवाई होऊन हिरण कुटुंबीयांना न्याय मिळेल,' असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT