Vikas Thakre-Tukaram Mundhe
Vikas Thakre-Tukaram Mundhe 
राज्य

तुकाराम मुंढेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची या आमदाराची मागणी

सरकारनामा ब्युरो

नागपूर : एकही करोनाचा रुग्ण नसताना ट्रस्ट ले-आऊटमधील नागरिकांना सोळा दिवसांपासून प्रतिबंधित करून ठेवणारे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच फौजदारी खटला दाखल करावा, अशी मागणी पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

न्यूमोनियाचा एक रुग्ण दगावला असताना मुंढे यांनी पश्‍चिम नागपुरातील ट्रस्ट ले-आऊट प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. ते करण्यापूर्वी तेथील नागरिकांच्या गरजा, व्यवसाय याची कुठलाच विचार केला नाही. 8 मेपासून त्यांना वस्तीच्या बाहेरही पडू दिले जात नाही. या भागात गायी-म्हशी व बकरी पालन करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. चाऱ्याची खरेदी व दुधाच्या विक्रीसाठी त्यांना रोजच बाहेर पडावे लागते. बाहेर पडण्यास प्रतिबंध घातल्याने गायी-म्हशी उपाशी आहेत. स्वस्त धान्य, भाजी, सिलिंडर खरेदीसाठी त्यांना बाहेर पडू दिले जात नाही. या परिसरातील अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्‍टर, नर्सेस, सरकारी कर्मचारी यांनाही याचा फटका बसत आहे. 

आयुक्त कोणाचेच ऐकायला तयार नाहीत. 14 दिवसाच्या लॉकडाऊनची मर्यादा 22 मे रोजी संपली आहे. 25 तारखेपर्यंत एकही रुग्ण या परिसरात आढळला नसताना हे क्षेत्र मोकळे केले जात नसल्याचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. मुद्दाम त्रास देण्याचा हा प्रकार आहे. नागरिकांना उपाशी ठेवले जात आहे. मानवाधिकाराचे हनन केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व तुकाराम मुंढेंवर फौजदारी खटला दाखल करावा, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT