Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 
राज्य

मुख्यमंत्री का म्हणाले की, वाघांची नसबंदी करावी लागेल !

राजेश रामपूरकर

नागपूर : वाघांचे संरक्षण आणि संवर्धन अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे वाघांची संख्या वाढली. पण ही संख्या अशीच वाढत राहिली तर वाघांसाठी जंगलं कमी पडतील. त्यामुळे वाघ आणि वाघिणींची तात्पुरती नसबंदी करणे, हा त्यासाठी शेवटचा पर्याय ठरतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. समिती नेमून आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करुन शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यानंतरच यावर निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१५व्या राज्य वन्यजीव मंडळच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. वनमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) रामबाबू, वन सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते. बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील निवडक वाघ आणि वाघिणीची तात्पुरती नसबंदी करणे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांच्या स्थलांतरणाच्या मुद्यासह १६ विषयांवर चर्चा झाली. दिड वर्षानंतर झालेल्या बैठकीत चद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरणाचा विचार करण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले, मानवाचे पुनर्वसन करण्यात येते, तर मग वन्यप्राण्यांचे का करता येऊ नसे, त्या धर्तीवर वाघाच्या पुनर्वसनासाठीही अभ्यासगट स्थापन करण्याच्या सुचना वन विभागाला त्यांनी दिल्या. वाघांची नसबंदी करण्यासंबंधी वन्यजीव तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अतीशय सावध भुमिका घेत या विषयावर पडदा टाकला. राज्यात ३१२ वाघ असून त्यातील काही वाघ चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर आहेत. चांगले संरक्षण व संवर्धनामुळे वाघांची संख्या वाढत आहे. पुढील वर्षातही वाढण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मोगरकसा, कन्हारगाव आणि तिल्हारी अभयारण्याच्या प्रस्ताव सादर करा, अशा सुचना दिल्या आहेत.

राज्य कांदळवन वृक्ष ‘सफेद चिप्पी’
राज्य सरकारने राज्यवृक्ष आंबा, राज्य प्राणी शेकरु, राज्यपक्षी हरियाल, राज्य फुलपाखरू म्हणून ‘ब्ल्यू मॉरमॉन’ व राज्य फुल जारूल घोषित केले आहे. त्याच धर्तीवर आता राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ‘सफेद चिप्पी’ला मान्यता देण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारणार
राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या संकल्पनेतून साकार झलेले व नागपूर येथील सेमिनरी हिल्स येथे कार्यान्वित असलेले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दिली. वनमंत्री संजय राठोड यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मानवासाठी जसे रुग्णालय असते, त्याच प्रकारे वन्यप्रण्यांसाठीही आरोग्य केद्र उभारले पाहिजे.

शहरांमध्ये वन्यजीव प्रशिक्षण केंद्र सुरू करा
नवयुवकांना वन्यजीवाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने वन्यजीव प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक शहरांमध्ये असे केंद्र सुरू करावे. त्यासाठी मदत करण्याची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT