Mla Tanji Jadhav News Osmanabad 
राज्य

शिवसेना सावंतांना पुन्हा सांभाळून घेणार? की त्यांच्या मनमानीला लगाम घालणार..

तानाजी जाधवर

उस्मानाबाद ः शिवसेना आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच दटावल्याने ते नव्या संकटात सापडले आहेत. आजवर वेगवेगळ्या मुद्द्यामुळे तसेच वक्तव्यामुळे सावंत वादात सापडल्याचे दिसुन आले. आतापर्यंत पक्षाने त्यांना समजुन घेतले आहे, पण यावेळी पक्ष काय भुमिका घेणार? याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

सावंत हे राजकारणात आणि शिवसेनेत काही नेत्यांच्या पाठींब्याने आले. अल्पावधीतच त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला. मातोश्रीवर वजन वाढल्याने सावंत म्हणतील ती पुर्व दिशा अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणाची झाली होती. यवतमाळ येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर ते मोठ्या मताधिक्याने निवडुन आले.

या विजयानंतर सावंत यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पक्षाने ही त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्यावर सोलापुर व उस्मानाबाद जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी  सोपवली.  त्या काळात सावंत यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली खरी, पण जुन्या लोकांना मात्र विश्वासात घेतले नसल्याची ओरड सुरू झाली.  विधानसभेच्या काही महिने अगोदर प्रा. सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली होती. तिथेही त्यांची काही महिन्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली.

अगोदर महाराष्ट्राला भिकारी बनवेन या त्यांच्या धक्कादायक विधानामुळे त्यांना सगळ्यांचाच रोष पत्करावा लागला. त्यांच्या या विधानाने शिवसेना देखील अडचणीत सापडली. मंत्री असताना खेकड्याने धरण फोडले असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी राज्यात एकच खळबळ उडवुन दिली होती. त्याचाही फटका वैयक्तिक सावंत आणि शिवसेनेला बसला. नंतर सारवासारव करण्यात दोघांचीही शक्ती खर्ची पडली. वारंवार वाद ओढावून घेणाऱ्या सावंत यांना तेव्हा गप्प रहा, असे आदेश देखील पक्षाकडून देण्यात आल्याची चर्चा होती.

विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सोलापुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील तिकिटवाटपाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सोलापुर जिल्ह्यात सहा पैकी फक्त एकच जागा शिवसेना जिंकु शकली होती. त्याला सावंत यांचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचे त्यावेळी बोलले गेले. मोहोळ, करमाळा, शहर, मध्यमध्ये उमेदवारी देताना बंडखोरी होणार याची माहिती असतानाही त्यानी नाराजांना शांत केले नाही.

बार्शीमध्ये दिलीप सोपल सारखा माजी मंत्री उमेदवार मिळुनसुध्दा अंतर्गत लाथाळ्यामुळे त्यांचा पराभव टाळता आला नाही. माढा मतदारसंघात सावंत यांच्या कुटुंबियाचे राजकारण असुनही तिथेही शिवसेनाचा दारुण पराभव झाला. उमेदवारी देताना सावंतानी मनमानी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी तेव्हा केला होता. त्यावेळी पासुन ते आतापर्यंत जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घडीच बसु शकली नाही. 

पक्षविरोधी भुमिका 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येत असताना ऐनवेळी सावंत यानी स्वतःचे सहा जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या हवाली केले व पुतण्याला उपाध्यक्ष पद पदरात पाडुन घेतले. मधल्या काळात सावंत हे मतदारसंघातुन गायब झाले. एखादा कार्यक्रम वगळता ते फारसे मतदारसंघात दिसलेच नाहीत. कोरोनाच्या काळातही ते आले नव्हते. त्यामुळे शिवसैनिकातुनही नाराजी पसरली होती.

आता तर थेट खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या विरोधातच जाहीर बैठकीत वक्तव्ये करुन त्यानी पक्षाला आव्हान दिले. भाजपच्या सोयीची भुमिका घेऊन  सावंत पक्षाला अडचणीत आणण्याचे कारण म्हणजे त्याना शिवसेनेने न दिलेले मंत्रीपद एवढेच असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. 

सावंत यांचा मनमानी कारभार तसेच अडचणीत आणणारे वक्तव्ये यामुळे पक्ष अनेकदा संकटात सापडला होता. अशावेळी वेळ मारुन नेऊन पक्षानेही त्याना समज दिली नाही. त्यामुळे पक्षामध्ये आपले कुणीच काही  बिघडवु शकत नाही, अशी त्यांची मानसिकता झाल्याची टीका सोलापुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT