After getting the decisive lead, Avtade reached the house of Prashant Paricharak
After getting the decisive lead, Avtade reached the house of Prashant Paricharak  
मुख्य बातम्या मोबाईल

निर्णायक आघाडी मिळताच आवताडेंनी गाठला परिचारक मालकांचा वाडा! 

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर  ः पहिल्या फेरीपासून आघाडी मिळवली असली तरी ती फेऱ्यांच्या हिंदोळ्यानुसार कमी-जादा होत होती. ही आघाडी काही हजारांची असल्याने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची उत्कंठा फेरीगणिक वाढत होती. मात्र, विजयाची चाहूल लागताच भाजपचे समाधान आवताडे बाहेर आले. निर्णायक मताधिक्य मिळाल्याचे दिसताच भाजपचे समाधान आवताडे यांनी पंढरपुरातील ‘मालकांचा’ वाडा गाठला आणि विजयाचे शिल्पकार असलेले प्रशांत परिचारक यांची भेट घेतली. या वेळी आवताडे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.  

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक लागलेल्या पंढरपूर मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांच्यात काट्याची लढत झाली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या पोटनिवणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंढरपुरात तळ ठोकला होता. त्यांच्याबरोबरच डझनभर मंत्री आणि दहा ते पंधरा आमदारांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.

दुसरीकडे, भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनीही आपली ताकद पणाला लावली होती. त्याअगोदर त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाऊले टाकत प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये समेट घडवून आणली होती. त्याबाबतची बैठक मुंबईतील एका हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर मतदारसंघातही नियोजनानुसार यंत्रणा राबविण्यात आली. प्रशांत परिचारक यांची मोठी ताकद आवताडेंच्या कामी आली आणि अशक्य वाटणारे आव्हान मोडीत काढीत भाजपचे कमळ या मतदारसंघात प्रथमच खुलले.    

या पोटनिवडणुकीचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरले ते पंढरपूर परिचारक. कारण त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावत आवताडे यांच्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतील, ते सर्व कष्ट घेतले. आमदार प्रशांत परिचारक यांच्या नियोजनाला त्यांचे बंधू उमेश परिचारक कष्टाची जोड मिळाली. गेल्या निवडणुकीत भालके यांना सहा हजारचे असणारे लीड तोडून परिचारक यांनी आवताडे यांना सुमारे एक हजाराची आघाडी मिळवून देत प्रचारात दिलेला शब्द पाळला. त्यांच्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ठरलं त्यातील तुम्ही किती पाळलं, असं विचारत त्यांनी तो प्रश्न विचारणाऱ्या नेत्याला उघडे पाडले होते.

आमदार परिचारक यांनी पंढरपूरच्या सभेत बोलताना ‘आम्ही विरोधकांना पंढरपूरमध्ये रोखतो. तुम्ही मंगळवेढ्यात मताधिक्य द्या. समाधान आवताडे कसे आमदार होत नाहीत, ते बघू,’ असे उघड आव्हान विरोधकांना दिले होते. तो त्यांनी पंढरपुरात मताधिक्य देत खरा करून दाखवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरातील अक्षरक्षः गल्लीबोळं धुंडाळली. त्यात त्यांनी परिचारक यांच्या कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण निकालावरून ते यशस्वी झाल्याचे दिसत नाही. 

पहिल्या फेरीपासून आघाडी मिळविणाऱ्या आवताडे यांना जसंजसे मताधिक्य वाढत गेले, तसतसा विजयाचा आत्मविश्वास येत गेला. फेरीगणिक वाढणाारी आघाडी निर्णायक टप्प्यावर येताच आवताडे यांनी आमदार परिचारक यांचा वाडा गाठला आणि त्यांचे अभिनंदन केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT