मुख्य बातम्या मोबाईल

पार्थला फटकारल्यानंतर अजितदादा शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर !

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "" पार्थ पवारांच्या मागणीला कवडीची किंमत नाही. ते अपरिपक्व आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतल्यानंतर माध्यमांनी पार्थ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मला याविषयी काहीही बोलायचे नाही !

त्यानंतर काही तासातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने श्री. पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याचे समजते. 

तसे वृत्त विविध वाहिन्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसापासून अजितदादांचे पुत्र पार्थ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेशी विसंगत विधाने करीत आहेत. त्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे. पार्थ यांनी केलेल्या मागण्या आणि ट्विटची दखल खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या श्री. पवार यांनीच घेतली आहे. 

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पार्थ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे व्हावा अशी मागणी करीत निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांनी पक्षाशी विसंगत अशाच भूमिका घेतल्या आहेत. अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडल्यानंतर पार्थ यांनी ट्विट करीत मंदिराला पाठिंबा दिला होता. तसेच हा दिवस एैतिहासिक असल्याचे म्हटले होते. 

पार्थ यांनी घेतलेल्या भूमिकेचा शरद पवार यांनी आज समाचार घेतला. पार्थ हे अपरिपक्व आहेत. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही असे म्हटले आहे. सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्यच आहे. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास असल्याचेही श्री. पवार यांनी म्हटले आहे. 

श्री. पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर पार्थ यांनीही कोणतेही विधान करण्यास नकार दिला. मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची बाजू घेतली आहे. पार्थ हे लंबी रेसका घोडा है असे सांगत त्यांना थांबू नकोस मित्रा असा सल्ला दिला आहे. 

शरद पवार यांनी पार्थला फटकारल्यानंतर अजितदादा सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT