ajit pawar, rajendra pawar
ajit pawar, rajendra pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

आमचं बरं चाललयं...तु्म्हाला पवार समजलेच नाहीत : अजित पवार

ज्ञानेश्वर रायते

बारामती :  राजू दादा माझ्यापेक्षा 13 महिन्यांनी मोठा, त्याला माझे सगळे माहिती व त्याचे सगळे मला माहिती, मी राजकारणात आल्यानंतर त्याने माझे काहीच सांगितले नाही. आम्ही दोघांचे जे काही असेल ते सगळे झाकून ठेवले. तुम्ही कितीही वाकून बघितले तरी तुमच्या हातात काहीच येणार नाही..असे सांगून अजित पवारांनी पॉझ घेतला..आणि सभागृहात हशा पिकल्यावर हळूच `आमचं बरं चाललंय, तुम्हाला पवार अजूनही समजलेच नाहीत` असे सांगत पुन्हा टाळ्या वसूल केल्या..!

कधी कोपरखळ्या तर कधी भावूक भावबंध यातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोरले चुलतबंधू राजेद्र पवार यांच्याशी त्यांचे जुळलेले ऋणानुबंध उलगडले. निमित्त होते राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीचे! बारामती येथील गदिमा सभागृहात झालेला हा कार्यक्रम पूर्णतः राजकारणविरहीत होता, सर्व पक्षांचे नेते या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. मात्र तरीही अजित पवार यांच्याच भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते. पवार आपल्या भावाविषयी काय नेमके सांगतात याची उत्सुकता असलेल्यांना मग अजितदादांनीही निराश केले नाही. 

ते म्हणाले,` राजूदादा 61 वर्षाचा झाला यावर विश्वासच बसत नाही. काळ कोणासाठी थांबत नाही. परंतू राजूदादा तुझ्या तब्येतीचे रहस्य सांग बाबा. आता 61 हा आकडा उलटा केला तरी तो शोभेन अशी त्याची तब्येत आहे. राजूदादाने कुटुंबाविषयी आज बरेच सांगितले. हे खरेय की, आबा  (गोविंदराव पवार) आणि बाईंनी (शारदाबाई पवार) संपूर्ण पवार कुटुंब वाढविले. दुसरी पिढीही खूप कष्ट करणारी ठरली. अडचणीच्या काळातही प्रत्येकाला संस्कार देऊन शिक्षित केले. एसटीच्या प्रवासात जेवणाचे डबे विटायचे. मात्र सगळ्या काकांनी तसले डबे खाऊन आपापले शिक्षण पूर्ण केले. तिसरी पिढी म्हणून आमच्यावर प्रेशर होते.``

``सर्व चुलते सगळे  झाले, आपण होऊ का, असे वाटायचे. साऱ्या पिढ्यांनी खूप कष्ट केले. राजूदादांनी आणि वहिनींनी अप्पासाहेब काकांनंतर खूप माणसे जोडली.  यासाठी समोरच्याला खूप विश्वास द्यावा लागतो व स्वतःही तसे वागावे लागते. 1975 मध्ये आप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेब काकांनी बेंगलोरहून गायी आणायच्या ठरवल्या. तेव्हा घरात माणसे होती, पण मला आणि राजूदादाला गायी आणायला पाठवले. आम्ही दोघे 15-16 वयाचे. बजाजच्या स्कूटर घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकमध्ये 24 गायी आम्ही आणल्या. दोन रात्री व दोन दिवसांचा प्रवास. मध्येच दूध काढायचे. ते दूध हॉटेलवाल्यांना विकायचे. शेण काढायचे. रस्त्याला दिसेल तेथे पाणी शेंदायचे. आज तुम्हाला वाटेल पवार कुटुंब असे आहे. मात्र आम्हीही बरेच काम केले आहे, अशा आठवणी अजितदादांनी सांगितल्या.

एक गोष्ट तर अशी की, शरदकाका मुंबईत होते, मात्र मुंबईत एका कामासाठी गेल्यानंतर गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढली. माझ्याकडून काही चूक झालेली होती, शरदकाका रागावतील म्हणून आम्ही तिकडे गेलोच नाही. राजूदादा हट्टी आहे. चिकाटीचा आहे. शेतीतील नवे प्रयोग पाहणे व ते करणे यात त्याला रस आहे. कष्ट केल्यानंतर यश मिळतेच यावर साऱ्या पिढ्यांचा विश्वास राहीला. आज रोहित यासही खूप चांगले घडवले. चौथ्या पिढीतील जेवढी मुले, त्यात फार लवकर कामाधंद्याला लागलेला मुलगा म्हणजे रोहित. ही माहिती सतीश मगर यांना सांगितली आणि मगर यांनी थेट लग्नच जमवले, असाही किस्सा त्यांनी सांगितला.

राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त करताना अशीच फिरकी घेतली. ते म्हणाले, `` मी लहान असताना घरातील सारी मोठी मंडळी मला तू लहान आहेस, आमचे ऐक असे म्हणायची. मी ऐकून घ्यायचो. आता माझा मुलगा, बायकोसह बहिणी व सारे कुटुंब म्हणाले,` दादा, तू आता साठीत गेला आहेस, आता तरी आमचे ऐक` मला एक कळतच नाही की, ऐकायचे वय नेमके कधी सुरू होते आणि संपते कधी?, अर्थात आता मात्र यापुढे मी कोणाचेच काही ऐकणार नाही. मी माझ्या आतल्या आवाजाचेच ऐकेन.` आणि पवार यांच्या या वाक्यानंतर सभागृहातील वातावरण भावनिक झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT