Ajit Pawar reached Matoshri to wish Uddhav Thackeray
Ajit Pawar reached Matoshri to wish Uddhav Thackeray  
मुख्य बातम्या मोबाईल

सकाळच्या सूचक शुभेच्छानंतर अजित पवार मातोश्रीवर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (ता. २७ जुलै) वाढदिवसानिमित्त देश आणि राज्यभरातून विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, रामविलास पासवान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मोदी आणि अजित पवार यांच्या ट्विटवरील शुभेच्छा संदेशाची मात्र चर्चा झाली. 

लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माझे लहान भाऊ असा केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय उलथापालथ होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. त्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यातून दोन्ही पक्षात कटुता निर्माण झाली आहे. त्यानंतरही मोदी यांनी आपल्या लहान भावाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. 

भाजपकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विविध नेत्यांनी ठाकरे यांचे ट्विटद्वारे अभीष्टचिंतन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच शुभेच्छा संदेशाचे ट्विट करून धमाल उडवून दिली. कारण त्यांच्या ट्विटचे राज्यात दिवसभरात विविध अर्थ काढून त्या शुभेच्छा संदेशाचा किस पाडण्यात आला. पवारांच्या त्या शुभेच्छा संदेशाला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिले. त्या उत्तराच्या ट्विटमध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे की ‘आपल्या शुभेच्छासाठी खूप खूप आभार अजितदादा. तुमच्या सहकार्याने कोरोनाविरोधातील लढा आपण नक्की जिंकू आणि महाराष्ट्राला आपण जगातील अव्वल राज्य बनवू.’ सकाळी दिलेल्या शुभेच्छा संदेशावर दिवसभर राजकीय चर्चा होत असताना अजितदादांनी मात्र थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री गाठले आणि उद्धव ठाकरे यांचे अभिष्टचिंतन केले. 

खासदार सुप्रिया सुळे यांनीही पवार आणि ठाकरे फॅमिलीतील सदस्य असलेला फोटो ट्विट करून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपल्या संयत, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू नेतृत्वाद्वारे उत्तम कार्य करत राहावे, या शुभेच्छांसह त्यांना दीर्घायु आणि सुयश चिंतितो,’ अशा शब्दांत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासोहब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले तसेच, शिवसेना नेत्यांसह मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT