At Alandi re-discusses the transfer of the Chief officers
At Alandi re-discusses the transfer of the Chief officers 
मुख्य बातम्या मोबाईल

आळंदीतील कारभाऱ्यांना भूमकरांचा लळा सुटेना; मुख्याधिकारी बदलीचे पुन्हा वारे 

विलास काटे

आळंदी (जि. पुणे) : आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारीपदी अंकुश जाधव यांची नेमणूक होऊन जेमतेम सव्वा महिनाच झाला. पण, जाधव नको, पुन्हा समीर भूमकरच मुख्याधिकारी हवे, यासाठी तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत सध्या मंत्रालयात चकरा मारत आहेत. राजकीय व्यक्तींकडून होत असलेले मुख्याधिकारी बदलीचे प्रयत्न पाहून आळंदीत सोशल मीडियावर टीका होत आहे. 

आळंदी शहर सध्या कोरोना विषाणूने ग्रस्त आहे. येथील आठ लोकांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या व्यतिरीक्त चिकुनगुनिया, डेंगीची साथही आहे. शहरातील रूग्णालये कोविड टेस्ट केल्याशिवाय उपचार करत नाहीत. कोविड सेंटर तयार आहे; पण कर्मचारी नाहीत. शहरात पाणीपुरवठा नीट होत नाही. आरोग्य व्यवस्था नीट नाही. शौचालयात अस्वच्छता, तर गार्डनमधे कंबरेइतके गवत वाढले आहे. शहरात डासांचा उपद्रव वाढलेले आहे.

राज्य सरकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या, तरी दुर्लक्ष केले जाते. अशा अवस्थेतून आळंदी नगरपालिका जात असताना चांगला मुख्याधिकारी आणि चांगले कारभारी कधी भेटतील, या आशेवर आळंदीकर दिवस ढकलत आहे. 

शहरात विविध प्रश्न आ वासून उभे असताना राजकीय पदाधिकारी मात्र वेगळ्याच कामात गुंतले आहेत. ते म्हणजे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा समीर भूमकरांची नियुक्तीसाठी प्रयत्न होत आहे. यामध्ये स्थानिक तालुकास्तरीय लोकप्रतिनिधीने यापूर्वीच पत्र दिले. शिवसेना भाजपच्या नगरसेवकांसह काही आजी माजी पदाधिकारी गेली काही दिवस मंत्रालय स्तरावर प्रयत्न करत आहेत. मुख्याधिकारी भूमकरांची बदली सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे झाली. तरीही ते आळंदीत रात्रीच्या वेळी काही पदाधिकाऱ्यांसोबत खलबते करत असल्याची चर्चा आहे. 

आळंदीकरांना सुविधा तर दूरच पण मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा मांडलेला खेळ पाहून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भूमकर यांनी आळंदीत मुख्याधिकारी म्हणून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यांच्या जागी अंकुश जाधव यांची नेमणूक झाली आहे. शहरात सध्या भामा आसखेडच्या पाईपलाइनसह पंचवीस ते तीस कोटींची कामे प्रलंबित आहे. निधी मंजूर असल्याने जुन्या मुख्याधिकाऱ्यांना आणल्यास आपले काम सोपे होणार,असे राजकीय मंडळींना वाटत आहे.

वास्तविक नागरिकांसह काही नगरसेवकही भूमकरांवर नाराज होते. मुख्याधिकाऱ्यांचे दालन सर्वसामान्यांसाठी बंद होते. भूमकरांच्या काळात अतिक्रमण, अनाधिकृत बांधकाम आणि वारेमाप नळजोड दिल्याचे सांगितले जाते. ठेकेदारांबरोबरची सलगी आणि दोन चार नगरसेवकांशीच संवाद ठेवल्याचा आरोप इतर नगरसेवक करत होते. 

पिण्याच्या पाण्यापासून दर्शनबारीचे आरक्षण उठविण्यात भूमकरांचा हात असल्याने वारकरीही नाराज होते. तीन वर्षांत करांची वसूलीही निट केली नाही. पाणी पुरवठ्याची रोजची बोंब, असे विविध प्रश्न भूमकरांच्या काळात गाजले असतानाही पदाधिकारी मात्र पुन्हा तेच मुख्याधिकारी हवे, यासाठी आग्रही राहिल्याने नागरिक सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करत आहेत. 

काही लोकांनी राजकारणाच्या माध्यमातून बदलीचा धंदा मांडला आहे. आम्हाला सध्या मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचा पाठिंबा आहे. बदलीच्या राजकारणात आम्ही पडत नाही. 

-वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्ष आळंदी (ता. खेड, जि. पुणे) 

नेमून दिलेले काम करणे महत्वाचे आहे. बदलीची चिंता करत नाही. सध्या आळंदीत कोरोना विषाणूची साथ, चिकुनगुनिया रोखणे महत्वाचे आहे. 

-अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT