Amit Shah did not deny meeting Sharad Pawar and praffulla patel
Amit Shah did not deny meeting Sharad Pawar and praffulla patel 
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवार, प्रफुल्ल पटेल अमित शहांना भेटले; त्यावर शहा म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल काल अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याची चर्चा आहे. ही भेट झाल्याचे शहा यांनीही नाकारलेले नाही. भेटीबाबत त्यांना विचारले असता 'प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही नाही', असे म्हणत शहा यांनी या भेटीबाबतचे गुढ कायम ठेवले. या भेटीवरून राज्यात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. 

मागील काही दिवसांपासून सचिव वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त  परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल आदी मुद्यांनी महाविकास आघाडी सरकार घेरले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. या सर्व प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

त्यातच अहमदाबाद येथे एका खास विमानाने शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गेले. त्याठिकाणी एका बड्या उद्योगपतीचीही त्यांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर ते दोघे अमित शहांना भेटले. भेटीचे कारण कळू शकले नाही. तसेच भेटीत काय चर्चा झाली याबद्दलही अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. एका गुजराती वर्तमानपत्रामध्ये या भेटीची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली. याबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

विरोधकांनी गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदली रॅकेटचा अहवाल थेट केंद्र गृहसचिवांना देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली. या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मान्य केले आहे. याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्यासह सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.

त्यातच काल शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भेट झाल्याचे नाकारले नाही. पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी `प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही,` असे म्हणत अधिक बोलायचे टाळले. पण शहा यांनी थेट शब्दांत ही भेट झाली नसल्याचेही अमान्य केले नाही.

संजय राऊत यांनी केलेली टीका

''परमबीर सिंग यांनी आरोप केले तेव्हा गृह खात्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले, पण महाराष्ट्र सरकारचा बचाव करायला एकही महत्त्वाचा मंत्री तत्काळ पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधिमंडळात केला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या आरोपांना कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते व मीडियाचा ताबा काही काळासाठी विरोधी पक्षनेत्यांनी घेतला हे चित्र भयंकर होते,'' अशा शब्दात शिवसेना खासदार व 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत  यांनी आपल्याच महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT