मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेना मंत्र्यांवर अनिल देसाईंची करडी नजर 

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः राज्यात युतीचे सरकार सत्तेवर येणार किंवा नाही याची संभ्रमावस्था कायम असताना मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थित राहिल्याने आज दिवसभर संशयकल्लोळ निर्माण झाला. 

"सह्याद्री' अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील ओल्या दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव असताना या बैठकीला शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सत्तास्थापनेवर चर्चा केल्याच्या वावड्या उठल्या आहेत. 

अतिथीगृहावर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तास्थापनेवर, मंत्रिपदाच्या वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारमध्ये एक सुकाणू समिती असावी आणि त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असावेत, असा एक प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. 

राज्यातील ओला दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याने संबंधित मंत्री उपस्थित होते. परंतु तेथे अनिल देसाई उपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले होते. युतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला घेऊन देसाई आले असावेत, अशी एक चर्चा असताना शिवसेनेचे काही मंत्री मुख्यमंत्र्यांना मॅनेज तर होणार नाहीत का, याकडे लक्ष ठेवण्यासाठी देसाईंना "मातोश्री'ने पाठविल्याचीही चर्चा सुरू होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT