Appointment of Shantaram Bhosale as BJP's Khed taluka president .jpg
Appointment of Shantaram Bhosale as BJP's Khed taluka president .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश अन् लगेच तालुकाध्यक्षपदी वर्णी 

उत्तम कुटे

पिंपरी : पक्षातील काहींशी सूर न जुळल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे खेड (जि.पुणे) तालुक्याचे माजी अध्यक्ष शांताराम भोसले (Shantaram Bhosale) यांनी बुधवारी (ता.२८) 'सरकारनामा'शी बोलताना केला. (ता. १९ जुलै) तारखेला मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत प्रवेश करणाऱ्या भोसलेंची फक्त आठवड्यातच पुण्यात मंगळवारी (ता.२७) खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०२४ चा खेडचा आमदार भाजपचाच करणार असून त्यादृष्टीने पक्षबांधणी करणार असल्याची नेमणुकीनंतरची पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Appointment of Shantaram Bhosale as BJP's Khed taluka president) 

आपण कुठलीच निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करून आपला भर पक्ष बळकट करण्यावर राहणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायती, सोसायट्या, बाजार समिती, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्याने त्यादृष्टीने प्रथम पक्ष बळकट करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. खेडचा आगामी आमदार भाजपचाच करणार यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील राहणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, भोसले यांच्या नियुक्तीने मावळते तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.

कारण ते जिल्हा परिषद सदस्यही असल्याने त्यांना आता आपल्या गटात पूर्णपणे लक्ष देता येणार आहे. पक्षसंघटना व झेडपी सदस्य म्हणून त्यांना कसरत करावी लागत होती. मागील विधानसभा त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. आगामी विधानसभेलाही ते तसेच दुसरे झेडपी शरद बुट्टे-पाटील यांचे नाव आतापासूनच चर्चेत आहे. त्यामुळे त्याच्या तयारीलाही देशमुख यांना पुरेसा वेळ आता मिळणार आहे. कोणाला विधानसभेला उमेदवारी द्यायची ते पक्ष ठरवेल हे स्पष्ट करून उमेदवार निवडून आणण्याचे काम, मात्र मी करणार आहे, असे भोसले यांनी सांगितले. त्याची सुरवात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्याने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

दहा वर्षे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षपद सांभाळणाऱ्या व राजकारणात असूनही वाद न ओढवून घेणाऱ्या भोसलेंनी तीन वर्षापूर्वी व्यावसायाकडे दूर्लक्ष झाल्याने व काहीशा घरगुती अडचणीतून पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सक्रिय राजकारणात नव्हते. मात्र, त्यांचा संपर्क कायम होता. पुन्हा स्थिरस्थावर होताच १९ जुलैला त्यांनी मुंबईत भाजपमध्ये पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

त्यानंतर आठवडाभरातच त्यांची पुन्हा तालुकाध्यक्षपदीच भाजपने वर्णी लावली. त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला भाजप प्रदेश पातळीवर घेण्याच्या विचारात होते. पण, तालुक्यातच काम करायची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने त्यांना तालुकाध्यक्ष करण्यात आले. त्याला स्वत; त्यांनीच आज दुजोरा दिला. आगामी निवडणुकांत युती न होण्याची शक्यता गृहित धरून त्या स्वबळाने लढविण्यासाठी तळागाळात पक्ष पोचवणार असून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर देणार, असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT