शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आशाताई बुचके या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बुचके यांचा भाजप प्रवेश पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा परिणाम करणारा ठरेल असे बोलले जाते. पुढील आठवड्यात बुचके या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.
आशाताई बुचके या वैष्णवधाम-बुचकेवाडी (ता. जुन्नर) येथील आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केल्यावर आशाताई बुचके यांनी जुन्नर तालुका शिवसेनेचे नेतृत्व केले. त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती. केवळ पाच हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
२०१९ मध्ये शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याशी झालेल्या तात्विक वादांनी त्यांची उमेदवारी हुकली. मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले व त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले. त्यावेळी बुचके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची ५१ हजार मते मिळाली होती. त्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी त्यांनी चर्चाही केली होती.
भाजपच्या मंत्र्याला शिवसेनेचे माजी आमदाराकडून शुभेच्छा...
विधानसभा २०१९ नंतर तब्बल दोन वर्षे सर्वच राजकीय पर्यायांचा विचार करुन त्यांनी अखेर शनिवारी (ता. १४) नारायणगाव मध्ये आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. त्यावेळी भाजपात जाण्याचे संकेत त्यांनी दिले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, ''आशाताईंच्या भाजपा प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या दोघांशीही बोलणे झाले आहे. हा पक्षप्रवेश जिल्ह्याच्या राजकारणासाठी मोठी घडामोड आहे. पर्यायाने हा प्रवेश मुंबई किंवा पुण्यात करण्याचे प्रयोजन आहे.''
जयश्री पलांडे यांच्या निर्णयाची उत्सूकता..
आशाताई बुचके आणि शिरुर-हवेलीतील जयश्री पलांडे या दोघींनीही पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक सभा गाजविल्या. शिवसेनेत डावलले जात असल्याची भावना आशाताई जाहीर व्यक्त करीत असताना जयश्री पलांडे अजूनही तरी मौन पाळून आहेत. दोघींनीही विधानसभा निवडणूकांमध्ये दोनदा आपले नशिब आजमावले. थोडक्या मतांनी दोघांचाही पराभव झाला. शिरुर-हवेली मतदार संघात माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा ४१ हजारांनी पराभव झाल्याने ते या पुढे विधानसभेला उभे राहणार नाहीत, असे अनेक भाजपा कार्यकर्ते म्हणतात. हीच संधी पाहून जयश्री पलांडे आता कार् निर्णय घेतात याची उत्सूकता आहे. गेल्या काही दिवसात आशाताई आणि जयश्रीताई एकमेकांच्या संपर्कात होत्या हे नाकारुन चालणार नाही.
Edited by : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.