Asha Shendge .jpg
Asha Shendge .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

गोंधळी नगरसेविकेची येरवडा तुरुंगात रवानगी  

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासून त्यांच्या दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा तानाजी शेंडगे-धायगुडे (Asha Shendge) (वय ४७, रा. सरिताकुंज,कासारवाडी) यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. शनिवारी (ता.११) पिंपरी न्यायालयाने त्यांच्यासह या गुन्ह्यातील त्यांच्या समर्थक महिलांसह दहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा, पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. (Asha Shendge remanded in judicial custody) 

दरम्यान, गेल्या तीन आठवड्यात भाजपच्या दोन नगरसेवकांना जेलवारी करावी लागली आहे. परिणामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या महिन्यात स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना एक लाख १८ हजार रुपयांची लाच एका ठेकेदाराकडून घेतल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. चार दिवस त्यांना पोलिस कोठडीत काढावे लागले. नंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. ३० तारखेला ते जामीनावर सुटले. ते बाहेर येताच नाही, तोच भाजपचे दुसरे नगरसेवक जेलमध्ये गेले आहेत. 

या महिन्यात ९ तारखेला नगरसेविका शेंडगे व साथीदार महिलांनी पालिकेत येऊन राडा केला. पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर त्यांनी गोंधळ घातला. पालिका आयुक्तांच्या कामात अडथळा आणत त्यांच्या नामफलकाला काळे फासले. तसेच पालिकेचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्याही केबिनमध्ये घुसून त्यांच्या टेबल व खुर्चीवर या टोळक्याने  शाई फेकली होती. त्याबद्दल सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शेंडगे व इतर दहाजणांविरुद्ध नोंदवून पिंपरी पोलिसांनी शेंडगेंसह आठ महिला व दोन तरुणांना लगेचच अटक केली होती. त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी काल (ता.१०) न्यायालयाने दिली होती. 

त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, पुन्हा त्यांची पोलिस कोठडी न मागता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. आरोपी हे सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. जप्त करण्यात आलेली शाईची बाटली आरोपींनी कोठून आणली त्याचा तपास करायचा आहे. ११ वा आरोपी संजय शेंडगे याचा शोध घेऊन त्यालाही अटक करायचे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळताच पाच महिला आरोपींना लहान मुले असल्याचे सांगून त्यांना तात्पुरता जामीन देण्यासाठी आरोपींचे वकिल अॅड. सुनील कडूसकर यांनी अर्ज केला. मात्र, ती मुले चार वर्षे व त्यापेक्षा मोठी असल्याचे दिसून आल्याने तो फेटाळण्यात आला. त्यामुळे येत्या मंगळवारी (ता.१४) पुणे सत्र न्यायालयात सर्वच आरोपींच्या नियमित जामीनासाठी अर्ज करणार आहे, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले.   

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT