Ashok Chavan criticizes Modi government over petrol-diesel price hike
Ashok Chavan criticizes Modi government over petrol-diesel price hike  
मुख्य बातम्या मोबाईल

थापा मारून सत्तेवर आलेल्या भाजपने सर्वसामान्यांचा खिसा कापला 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्वस्त झाल्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतातच कशा, हे अनाकलनीय गणित केंद्र सरकारने देशाला समजावून सांगावे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

वाढत्या इंधन दराच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्षाच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होताना त्यांनी हे विधान केले. या संदर्भात ते म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर निश्‍चित केल्या जातात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरते, तेव्हाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जातात. तिकडे भाव कमी होणार, तरीही आपल्याकडे भाव वाढणार, हे गणित लोकांच्या समजण्यापलिकडचे आहे. त्यामुळे केंद्राने याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज त्यांनी विशद केली. 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या थापा मारून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने मागील सहा वर्षांत केवळ सर्वसामान्य जनतेचा खिसा कापण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 87 रूपये, तर डिझेलचा दर 79 रूपयांवर गेला आहे. आज क्रूड ऑइलचा एक बॅरल 41 डॉलरला मिळतो. कॉंग्रेसच्या काळात एका बॅरलचा दर 110 डॉलरवर गेला होता. तरीही पेट्रोल-डिझेल इतके महागले नव्हते, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

भरीसभर म्हणजे भाजपच्या केंद्र सरकारने सहा वर्षांत अनेकदा उत्पादन शुल्कात वाढ केली. त्याचाही मोठा फटका लोकांना बसला आहे. गेल्या सहा वर्षांत पेट्रोलवरील उत्पादन शुल्क अडीच पटींनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क आठ पटींनी वाढले. करवाढीचे हे प्रमाण समर्थनीय असू शकत नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती तातडीने कमी कराव्यात, अशी मागणीही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

इंधनदरवाढीच्या नावाखाली सरकार खंडणी उकळतेय; सोनिया गांधींचा हल्लाबोल 

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने लॉकडाउनच्या काळात 22 वेळा इंधन दरवाढ केली आहे. सरकार इंधन दरवाढीच्या नावाखाली जनतेकडून खंडणी उकळत आहे, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केली. सरकारने तातडीने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मोदी सरकारने 2014 पासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 12 वेळा वाढ केली असून, यातून 18 लाख कोटी रुपये मिळविले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कॉंग्रेसने इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी 'इंधन दरवाढीविरोधात बोला' ही मोहीम आजपासून देशभरात सुरु केली आहे. या मोहिमेत सोनिया गांधी आज सहभागी झाल्या. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन इंधन दरवाढ कमी करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन करण्यात आले. या सोशल मीडियावरील मोहिमेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही सहभाग नोंदविला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT