ashok chavan
ashok chavan 
मुख्य बातम्या मोबाईल

काहींना भीतीपोटी भाजपमध्ये जावं लागलं : अशोक चव्हाण 

संदीप काळे

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नांदेड मध्ये वेगळं असं संघटन उभं केलं आहे. निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांची संदीप काळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत    

लोकसभेनंतर विधानसभेची काय तयारी सुरु आहे?

विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. याची तयारी जोरदार सुरु आहे. काँग्रेस पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. हे लक्षात घेऊन नव्यांना संधी देण्याचे काम मुंबईत सुरु आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरु आहेत.

त्यातून लवकरच आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करू. दोन्ही पक्षाच्या जवळपास सव्वाशे-सव्वाशे जागा निश्चित झाल्या आहेत. सर्व चर्चा झाल्यानंतर दिल्लीतील नॅशनल इलेक्शन कमिटीमध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय येईल. आतापर्यंत झालेल्या मीटिंगमध्ये जवळपास ६० जणांची नावे निश्चित झाली आहे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी न दिल्याने काँग्रेसवर ही वेळ आली आहे, यावर काय सांगाल?

तसं काहीच नाहीये. मी तर म्हणतो, काँग्रेसमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी आहे. काहींना भीतीपोटी भाजपमध्ये जावं लागलं. भाजपमध्ये जाण्यासाठी काही लोकांवर दबाव टाकण्यात आला. भाजपाने संपूर्ण देशभर फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. त्यामुळे नवीन रक्ताला, नवीन चेहऱ्यांना याठिकाणी संधी आहेत. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर कोणतं आव्हान आहे?

आव्हान असं नाही. आम्ही भाजपाला वैचारिक आव्हान देऊ शकतो. त्यांच्याकडे साधनसामुग्री आहे, पैसे आहे, शासकीय यंत्रणा आहे. त्यात भर म्हणजे मुख्यमंत्री स्वतः म्हणतात, साम-दाम-दंड-भेद वापरा, आपली जागा निवडून आणा.. ही  त्यांची भूमिका आहे. हे आव्हानात्मक आहे. मात्र आमच्याकडे वैचारिक भूमिका असल्याने आम्ही केलेली गेल्या चार वर्षांतील कामगिरी आपण पाहिली. 
स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवणारा भाजप स्वतःला उमेदवार नाही म्हणून बाहेरून उमेदवार घेण्याची वेळ त्यांच्यावर येते, म्हणजे किती वैचारिक दिवाळखोरी आहे. स्वतःच्या पक्षातील किंवा आरएसएस, भाजपमध्ये जे काही जुने कार्यकर्ते आहेत, ते निवडून येण्याइतके सक्षम नाहीत त्यामुळे त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीतून उमेदवार घ्यावे लागत आहेत. 
सध्या बेरोजगारी हा प्रचंड मोठा मुद्दा आहे. बेरोजगार तरुण-तरुणी हे त्यांच्या आश्वसनापोटी भरवशावर राहिले. मात्र प्रत्यक्षात काही घडले नाही, ही वस्तुस्तिथी आहे. आरक्षणाची अंमलबाजवणी प्रत्यक्षात कुठे दिसत नाही. धनगर, आदिवासी, कोळी समाजाचे प्रश्न तसेच आहेत. सरकारी नोकरीतील मेगाभरती तशीच आहे.
 शेतकऱ्यांचे प्रश्न तर फारच कठीण झाले आहेत. १२ हजार पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात. पंतप्रधान राज्यात येतात, मात्र या एकही विषयावर एक शब्दही बोललं जात नाही. अमेरिकेत जाऊन तेथील भारतीयांसमोर भाषणे देतात. लोकांसमोर एकप्रकारे भ्रम निर्माण करत आहेत की, भारतात सर्व काही आलबेल आहे. परिस्थिती मात्र  वेगळी आहे. 

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरु आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?

भाजप हा आयाराम-गयारामांची पक्ष राहिलेला आहे. भाजपने घटनेच्या पद्धतीला काळिमा फासला आहे, लोकशाहीची विटंबना केली आहे. घटनेमध्ये दिलेल्या मुलभूत विचारांना त्यांनी तिलांजली दिली आहे. आपण पाहतोय, लोकांना आकर्षित करा, भीती दाखवा, यांसारखे प्रकार करून निव्वळ लोकशाहीचा बाजार मांडला आहे.  

विविध  कंपन्या बंद होत असल्याने तरुण बेरोजगार होत आहेत, काय सांगाल?

भाजपाने आर्थिक गणित पूर्ण बदलले आहे. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात निर्माण झालेलं प्रचंड नुकसान याकडे कुणीच काही बघत नाही. अनेक कंपन्यांनी आपले प्रोडक्शन बंद केले आहे.  कुणी पाच दिवसांचा आठवडा केला, कुणी तीन दिवसांचा आठवडा केला, काही लोकांना घरी पाठवत आहेत, पगार कापले जात आहेत, वाहनांची निर्मिती कमी करण्यात आलेली आहे. नवीन रोजगार देणं एकाबाजूला राहिले, आहे तोच रोजगार लोकांच्या हातून काढून घेतला जात आहे.  या आर्थिक मंदीवर कुठलाही ठोस उपाय नाही. आज अर्थमंत्र्यांनी केलेल्या उपायांचे अनुकूल चित्र बाहेर दिसत नाही.

अशोक चव्हाण यांचे वर्चस्व सगळीकडे पाहायला मिळत, त्याबाबत काय सांगाल?

अशोक चव्हाणांची भीती वाटते म्हणून अशोक चव्हाणांच्याभोवती एकप्रकारे चक्रव्यूह निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. हरकत नाही, मी वाट पाहतोय याठिकाणी पंतप्रधान आणि फडणवीस कधी येतायत.. आता ते सत्र सुरूच होईल. लोकशाहीमध्ये हा विरोधी पक्ष टिकून आहे, मात्र त्यांची जी भाषा आहे, त्याविरोधात कोणीच काही भूमिका घेऊ शकत नाही. 

वंचित कोणासाठी काम करतेय? 

वंचित असेल तर नुकसान काय आहे, याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे, असं माझं मत आहे.  कारण माझ्याजागी पाहायचं झालं तर, दीड लाख मतं खराब झाली, ना फायदा माझा झाला ना त्यांचा झाला. यामध्ये फायदा झाला तो भाजपचा..! हेच चित्र दिसलं. त्यांची मत वेगळी असू शकतात, मात्र जे घडलंय ते डोळ्यासमोरील वास्तव आहे. 

आता दिनक्रम कसा असतो तुमचा?

प्राथमिक प्रक्रिया सध्या सुरु आहे. मतदार संघाची काही कामे बाकी आहेत. गेल्या महिन्याभरात माझे भरपूर कार्यक्रम झाले. गावांना भेटी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये ज्या बैठका सुरु आहेत, त्या नुकत्याच संपवून मी नांदेडला आलो आहे. पुढील काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या बैठक होणार आहेत. 

एमआयएमबद्दल काय सांगाल?

एमआयएमला औरंगांबादमध्ये एक जागा मिळाल्याने त्यांच्या आशा थोड्या वाढल्या आहेत. मात्र मला वाटत की, जे अल्पसंख्यांक मते आहेत, त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, अशा पक्षांना मते देऊन काही उपयोग नाही. एमआयएम ही भाजपविरोधात ताकद महाराष्ट्रात उभी करू शकत नाही. काँग्रेसचं भाजपच्या विरोधात  एक मजबूत पक्ष म्हणून उभा राहू शकतो. मला खात्री आहे, जो काही अल्पसंख्यांक समाज आहे, त्या काँग्रेसला साथ देतील अशी माझी अपेक्षा आहे. 

गेल्या पाच वर्षात सरकारची कुठली दोन कामे तुम्हाला आवडली?

सरकारचे आतापर्यंत एकही काम आवडलं नाही. फक्त घोषणा, घोषणा आणि घोषणांचा सुकाळ आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत दुष्काळ आहे. 

मीडियाच्या माध्यमातून अनेक कामे झाल्याचे भाजप सांगत आहे, त्यावर काय मत आहे?

मोठ्या प्रमाणात त्यांना जाहिराती मिळत आहेत. सरकारी पैशांची ही उधळण आहे. एकही काम यातील झालेलं नाही. 

निवडणूक खूप महागल्या त्याला कोण जबाबदार आहे?

सत्ताधारी पक्षांमुळेच हे होत आहे. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा त्यांचा मनसुबा आहे. सर्व वातावरण त्यांनी बिघडवल असल्याचं माझं मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT