The aspiring director for the Shirur Bazar Samiti chairman took a cautious stance
The aspiring director for the Shirur Bazar Samiti chairman took a cautious stance 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकायचे नसते तर आधीच करेक्ट कार्यक्रम केला असता...

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर ‘छुपे डाव' उघड होऊ लागल्याने सर्वच संचालकांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. तलवार पाजळीत सभापतिपदाच्या समरात उडी घेतलेले इच्छुक मात्र आता ‘पक्ष घेईल तोच अंतिम निर्णय' असे सावध पावित्र्यात येऊन सांगू लागले आहेत. (The aspiring director for the Shirur Bazar Samiti chairman took a cautious stance)

दरम्यान, सभापतीपदाचा पक्षपातळीवर जो निर्णय होईल, त्याला माझ्यासह सर्व संचालकांचा एकमुखी पाठिंबा असेल. आम्हाला वेगळे काही करायचे असते; तर सुरूवातीला शशिकांत दसगुडे यांना सभापती केले, तेव्हाच विरोधकांशी संगनमत करून केले असते, अशी सावध भूमिका आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी मांडली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापू काळे यांनी सभापती निवडीवरून राष्ट्रवादीत कुठलीही दुफळी किंवा कुठल्याही भागाचा वाद नसल्याचे सांगितले.

शंकर जांभळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर शिरूर बाजार समितीच्या नवीन सभापतिपदासाठी येत्या शनिवारी (ता. 10 जुलै) संचालक मंडळाची सभा होणार आहे. वर्षभरासाठीच्या या पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार ऍड. अशोक पवार हे येत्या दोन दिवसांत सर्व संचालक व इच्छुकांची मते जाणून घेण्याची शक्‍यता आहे. या नेत्यांच्या निर्णयावरच सभापतीनिवडीची प्रक्रिया अवलंबून असल्याने ते कुणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घालणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

शिरूर बाजार समितीच्या सभापती निवड प्रक्रियेत कधीही काहीही घडू शकते, हे यापूर्वीच्या काही प्रसंगांमुळे सिद्ध झाल्याने नेतेमंडळींनीही अंतिम क्षणापर्यंत सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. या नेत्यांच्या पातळीवर सभापतीपदाबाबत संचालकांचे एकमत न झाल्यास दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील या निर्णयप्रक्रियेत लक्ष घालावे लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

या पार्श्‍वभूमीवर काही संचालकांनी एकत्र येऊन जांभळकर यांच्या राजीनाम्याबाबत व नूतन सभापती निवडीबाबत चर्चा केल्याचे वृत्त पसरताच संबंधित संचालकांनी कानावर हात ठेवले. स्वतः जांभळकर यांनी टाकळी हाजी जवळील कुंड किंवा त्या परिसरात अशी कुठलीही मिटींग झाल्याचा इन्कार केला. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे याविषयातील माझा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप असण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे ते म्हणाले. 
 
बहुमतापेक्षा अधिक संचालक त्यावेळी आमच्यासोबत होते  ः पाचुंदकर

सभापती निवडीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे निर्णय घेतील. एकापेक्षा अनेक इच्छुकांमुळे स्पर्धा वाढली असली; तरी पक्षपातळीवर जो निर्णय होईल, त्याला माझ्यासह सर्व संचालकांचा एकमुखी पाठिंबा असेल. आम्हाला वेगळे काही करायचे असते; तर सुरूवातीला शशिकांत दसगुडे यांना सभापती केले, तेव्हाच विरोधकांशी संगनमत करून केले असते.

त्यावेळी वरिष्ठ पातळीवरून सभापतिपदासाठी माझेच नाव निश्‍चित झाले होते. मात्र, मला डावलून ऐनवेळी दसगुडे यांना सभापतिपदाची संधी दिल्यावर अनेक संचालक नाराज झाले होते. बहुमतापेक्षा अधिक संचालक त्यावेळी आमच्यासोबत होते. तरीही पक्षशिस्त पाळली आणि पक्षादेश मानला. सभापती निवडीवेळी सभात्याग केला हे खरे असले; तरी वळसे पाटील यांनी दिलेल्या आदेशावरून दसगुडे यांना मतदान करून मगच बाहेर पडलो, असे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.

 कुठलाही भागाचा वाद नाही : राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काळे

सभापती निवडीवरून राष्ट्रवादी पक्षात कुठलीही दुफळी किंवा कुठलाही भागाचा वाद नाही. विधानसभा निवडणूक वगळता इतर सर्व निवडणुका या संपूर्ण तालुका म्हणूनच होतात. त्यामुळे हा या भागातला, तो त्या भागातला हा विषय नाही. सभापती निवड प्रक्रियेतही ही एकसंधता कायम असून, बाजार समितीचा कुणीही संचालक पक्षशिस्तीच्या बाहेर जाणार नाही. अजितदादा, वळसे पाटील, अशोक पवार सभापतिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील व पक्षशिस्त मानून तो सर्व संचालक मान्य करतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापू काळे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT