Aspiring Shiv Sena leader for Pandharpur by-election met Sharad Pawar
Aspiring Shiv Sena leader for Pandharpur by-election met Sharad Pawar  
मुख्य बातम्या मोबाईल

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी इच्छूक शिवसेना नेत्याने घेतली शरद पवारांची भेट 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत विद्यमान सरकार सकारात्मक आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी स्वतः या योजनेबाबत चर्चा करून आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचना करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे, अशी माहिती शिवसेना नेत्या शैला गोडसे यांनी सांगितली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद व प्रत्यक्ष कामाला तत्काळ सुरुवात करावी यासाठी शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील येथील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. 

दुष्काळी 35 गावांतील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या उपसा सिंचन योजनेसाठी दोन टीएमसी पाणी उपलब्ध झाले असून 530 कोटींच्या खर्चाला 2014 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा, उपोषण, आंदोलन करूनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली आहे. 

मंगळवेढा तालुक्‍याचा समावेश असलेल्या पंढरपूर मतदार संघात आता पोटनिवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्या अगोदर प्रशासकीय मान्यता देऊन दुष्काळी 35 गावांतील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी "उपसा सिंचन योजना मार्गी लावणे, हीच खरी भारतनानांना श्रद्धांजली ठरेल,' असे वक्तव्य केले होते, याचीही आठवण आपण शरद पवार यांना करून दिली. त्यावर पवार यांनी यात स्वतः लक्ष घालण्याचे संकेत दिले, असेही शैला गोडसे यांनी नमूद केले. 

येत्या काही दिवसांत पंढरपूर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना नेत्या गोडसे याही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आता उपसा सिंचन योजना, पाणी प्रश्नावर थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. 

दरम्यान, मंगळवेढा शहरालगतच्या बसवेश्‍वर स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लागावा, यासाठीही शैला गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या स्मारकाच्या कामासाठी अजित पवारांनी तरतूद केली आहे. तत्पूर्वी गोडसे यांनी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यासह सोलापुरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची याच प्रश्‍नासंदर्भात भेट घेत निधीची मागणी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT