Attempt to defame NCP on Corona: Vaishali Nagwade
Attempt to defame NCP on Corona: Vaishali Nagwade  
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोनावरून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न : वैशाली नागवडे 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (जि. पुणे) : "कोरोना निगेटिव्ह रुग्णांना पॉझिटिव्ह दाखवून काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करून त्यांचे जीव धोक्‍यात घालण्याचे काम पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यात सुरू आहे. तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार आणि सरकारच्या योजनांचा लाभ न देता राष्ट्रवादी कॉंग्रेसला बदनाम करीत आहे,' असा गंभीर आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केला. 

दौंड शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत वैशाली नागवडे यांनी हा आरोप केला. तालुक्‍यातील केडगाव येथील एका अधिग्रहित रूग्णालयात रुग्णांकडून केली जाणारी वाढीव बिलांची वसुली, संशयास्पद स्वॅब रिपोर्ट आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही. या प्रकरणी नागवडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. 

त्यानुसार डॉ. नांदापूरकर यांनी 18 सप्टेंबर रोजी समक्ष रुग्णालयाची पाहणी केली. तक्रारींची दखल घेत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी केडगाव (ता. दौंड) येथील मयूरेश्वर हॉस्पिटलच्या वाढीव बिलांची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती नियुक्त केली आहे. तीन शासकीय डॉक्‍टर, दोन अव्वल कारकून, एक लेखाधिकारी व एक लेखा परीक्षक, असे एकूण सात अधिकारी यांचा त्या समितीमध्ये समावेश आहे. 

तालुक्‍यात वेळेवर उपाययोजना न झाल्याने बाधितांचा आकडा वाढत आहे. रूग्णांना वारेमाप पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधितांवर कारवाई न करता त्यांना अप्रत्यक्षपणे पाठीशी घातले जात आहे, असा आरोप वैशाली नागवडे यांनी केला. 

खासगी रुग्णालयांकडून बाधितांना आगाउ रकमेची पावती, वैद्यकीय अहवाल, औषधांची यादी आणि केलेल्या उपचारांची माहिती दिली जात नाही. रुग्णांना लुबाडणाऱ्यांची माहिती असतानाही वेळीच कारवाई न करता प्रांताधिकाऱ्यांपासून आरोग्य व महसूल यंत्रणेतील काही अधिकारी संगनमताने पक्षाला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे या पक्ष पदाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधून उपाय योजना करीत आहेत. एकीकडे सरकार आवश्‍यक निधी आणि यंत्रणेसह उपकरणे देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत असताना दौंड तालुक्‍यातील शासकीय यंत्रणा मात्र नागरिकांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवून सरकारविषयी नाराजी वाढविण्याचे काम करीत आहे, असा आरोप नागवडे यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT