Atul Bhatkhalkar - Uddhva Thackeray
Atul Bhatkhalkar - Uddhva Thackeray 
मुख्य बातम्या मोबाईल

मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी नियमावली नाही का?....

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सरकारी कार्यालयात उशीर येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. त्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?...अशी खोचक विचारणा भातखळकर यांनी ट्वीटद्वारे केली आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची सक्ती करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार उशिरा येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होणार आहे. एका महिन्यात फक्त दोन वेळा दीड तास उशिरा येण्याची मुभा अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस उशिरा आल्यास गैरहजेरी लावली जाईल किंवा उपलब्ध रजेतून रजा वजा होणार आहे. नऊ आणि त्यापेक्षा जास्त दिवस उशिरा आल्यास वेतन कपात होणार आहे.  रेल्वे विस्कळीत किंवा इतर घटना आकस्मित घटना घडल्यास त्याची खातरजमा करून निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

ही संधी साधत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर तीर मारला आहे. ''कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर...आणि मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?...'' असे विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री मातोश्री या आपल्या निवासस्थानातून कारभार करत होते. भाजपच्या नेत्यांनी यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.  राज्यात दोन मुख्यमंत्री असून एक मातोश्रीवरून राज्य चालवतायत आणि एक जण राज्यभर फिरुन राज्य चालवत आहे, अशी मिश्किल टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे नांव न घेता केली होती. आता पुन्हा एकदा भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या टीकेच लक्ष्य बनवले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT