Atul Bhatkhalkar demands to file case against Anil Deshmukh
Atul Bhatkhalkar demands to file case against Anil Deshmukh 
मुख्य बातम्या मोबाईल

देशमुखांविरोधात गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात जाणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.  देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यास सांगितले होते, अशी तक्रार भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात केली आहे. तसेच उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भातखळकर यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल करून देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केलेल्या प्रत्येकाची चौकशी करावी. परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात नावे आलेल्या अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे, पोलीस उपायुक्त भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केल्यास सत्य समोर येतील, असे भातखळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे देशमुखांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून 24 तासांत गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयाचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. 

तर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत देशमुख यांच्या अटकेची मागणी केली. देशमुखांनी होम क्वारंटाईनमध्ये असताना पत्रकार परिषद कशी घेतली? त्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार रुग्णालयातून घरी आल्यानंतर क्वारंटाईनचा सल्ला दिला जातो. असे असताना देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच रुग्णालय प्रशासनानेही पत्रकार परिषद घेण्यात परवानगी कशी दिली?, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करावीच लागेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. देशमुख यांनी १५ तारखेला नागपूरच्या अॅलेक्सिस रुग्णालयात पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान, देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांना मुंबईतल्या रेस्टाॅरंट्स, डान्स बारमधून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यावरुन राजकीय धुरळा उडाला आहे. विरोधी पक्ष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर आज पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची पाठराखण केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT