pokale12.jpg
pokale12.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

#औरंगाबाद पदवीधर मतदार  : भाजप किसान मोर्चाचे रमेश पोकळे यांचा अर्ज दाखल

सरकारनामा ब्युरो

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमेच्या साक्षीने उमेदवारी दाखल केली. शिक्षण क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षापासून आपण सक्रिय कार्य करत आहोत. त्यामुळे मला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांच्याशी चर्चा केली आहे, असे रमेश पोकळे म्हणाले.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे आज हयात असते तर मलाच अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असती. एवढेच नव्हे तर साहेब स्वतःमाझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले असते. परंतु ते हयात नसल्यामुळे त्यांची प्रतिमा सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचेही रमेश पोकळे म्हणाले. दरम्यान, भाजपने औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाकडून आपणास न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करून आपल्याला क्रमांक एक ची उमेदवारी देणे शक्य नसेल तर दुसरा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली तरी आपण राष्ट्रवादीला पराभूत करू शकतो, असा विश्वासही रमेश पोकळे यांना आहे.

मतदारसंघात मतदान पक्षीय चिन्हावर नव्हे तर पसंती क्रमांकावर होते. त्यामुळे या मतदारसंघात दोन उमेदवार  द्यावेत, असा प्रस्ताव पक्षाकडे दिला आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात जिल्ह्यात भाजपच्या विजयाचा आलेख उंचावलेलाच राहीलेला आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी २०१३ मध्ये त्यांच्या खांद्यावर टाकलेली भाजप जिल्हाध्यक्षपदाची धुरा २०२० च्या सुरुवातीपर्यंत त्यांच्याकडेच होती. दिवंगत आमदार वसंतराव काळे यांच्या प्रेरणेतून रमेश पोकळे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर काम सुरु केले. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना बाजार समितीचे उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अशा पदांवर कामांची संधी मिळाली. त्यानंतर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये गेलेल्या रमेश पोकळे यांना भाजप विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद भेटले. त्यांच्या कामाची तडफ पाहून त्यांना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदही मिळाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळांत झालेल्या निवडणुकांत जिल्ह्यात भाजपच्या विजयाचा आलेख उंचावलेलाच दिसत आहे.

दिवंगत मुंडेनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांचेही विश्वासू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द मुंडे एक लाख ४० हजारांच्या फरकाने विजयी झाले. तर, पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे पाच आमदार विजयी झाले. याच वेळी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत डॉ. प्रितम मुंडे साधारण सात लाखांच्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाल्या. आताही लोकसभेला डॉ. मुंडे मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आहेत. वास्तविक भाजपच्या विजयाच्या शिल्पकार पंकजा मुंडे असल्या तरी यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश पोकळे यांच्या बॅलेन्सशीटमध्ये आकड्यांचे गणित निश्चितच पडत आहे. सध्या ते भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT