Lokhande and tanpure.jpg
Lokhande and tanpure.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

गर्दी टाळण्यासाठी चक्क खासदार लोखंडेंना डावलले ! मंत्री तनपुरे यांचा असाही खुलासा

विलास कुलकर्णी

राहुरी : निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शनिवारी दौरा केला. कुठेही उद्‌घाटनाचा कार्यक्रम नव्हता. अधिकाऱ्यांवर दबाव राहावा, कामे जलद व्हावीत, शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळावे, असा त्यामागे उद्देश आहे. कोरोनामुळे गर्दी नको, यासाठी लोकप्रतिनिधींना निमंत्रण नव्हते. कोणीही गैरसमज करू नये, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. (To avoid the crowd, the MP slammed the iron! Minister Tanpure also made such a revelation)

राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत तनपुरे बोलत होते. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जलसंपदामंत्र्यांच्या दौऱ्यात निमंत्रण दिले नाही, म्हणून नाराजी व्यक्त करताना कोरोना काळात गर्दी केल्याने मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात व प्राजक्त तनपुरे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. त्यावर मंत्री तनपुरे यांनी वरील खुलासा केला. 

ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी प्राधान्य दिले आहे. कोरोना काळात निधीची टंचाई असताना निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे वेगाने प्रगतिपथावर आहेत. भाजप सरकारच्या काळात कालव्यांची बांधकामे अवघी नऊ टक्के झाली. 81 टक्के बांधकामे शिल्लक होती. "मागील दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने वेगाने कामे करून 47 टक्के बांधकामे पूर्ण केली. 18 टक्के बांधकामे प्रगतीत आहेत. कालव्याची कामे जलद गतीने करावीत, यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहे.' 

"कोरोना लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्राच्या चुकीमुळेच लसीच्या तुटवडा भासत आहे. लसीकरणासाठी गर्दी वाढत असून, नियोजन कोलमडत आहे, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.

हेही वाचा..

राहुरीतील उजव्या कालव्याच्या कामाची लवकरच निविदा

राहुरी : ""राहुरी तालुक्‍यातील निळवंडे उजव्या कालव्याच्या शेवटच्या अकरा किलोमीटरच्या कामाची निविदाप्रक्रिया लवकरच सुरू होईल,'' असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. 

कानडगाव (ता. राहुरी) येथे शनिवारी निळवंडे उजव्या कालव्याच्या कामाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जलसंपदाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, निळवंडेचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, अलका अहिरराव, गिरीश संघानी, सायली पाटील, गणेश नान्नोर, संगीता जगताप, काशिनाथ मासाळ आदी उपस्थित होते. 

मंत्री पाटील म्हणाले, ""निळवंडे कालव्यांच्या कामासाठी यंदा सर्वाधिक 491 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्याप्रमाणे कामे वेगाने सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यावर चालू वर्षअखेर आणखी सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये देण्याचे नियोजन आहे. ऑक्‍टोबर 2022अखेर दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करून, पाटचाऱ्या व वितरिकांची कामे करण्याचे नियोजन आहे. 

""माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मागणीनुसार मुळा व भंडारदरा धरणांच्या सिंचन व्यवस्थापनाची नाशिक येथील मंडल कार्यालये नगर येथे हलविण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल. मुळा नदीपात्रातील चार बंधाऱ्यांसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. धरणातील पाण्याची उपलब्धता व तांत्रिक अडचणी पाहून त्यावर कसा मार्ग काढता येईल ते पाहू,'' असेही पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT