andolan.jpg
andolan.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भयंकर ! नगर जिल्हयात तीन-चार तास पुरेल एव्हढाच आॅक्सिजन, रुग्णांचे काय होणार

मुरलीधर कराळे

नगर : नगर जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनबरोबरच आॅक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आज (ता. 20) सायंकाळी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, केवळ दोन-तीन तास पुरेल एव्हढाच साठा असल्याचे डाॅक्टर सांगत आहेत. त्यामुळे रुग्णांची जीव टांगणीला लागला आहे. रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले असून, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आॅक्सिजनची कमतरता आहे. नगर जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात तर गेल्या पाच-सहा दिवसांपासून आॅक्सिजन बेड मिळत नाही. सध्या असलेला आॅक्सिजन उपस्थित रुग्णांनाच द्यायचा असल्याने नवीन रुग्ण कोणतेही रुग्णालय स्विकारत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण अखेरची घटका मोजत आहेत. अशातच आज काही डाॅक्टरांनी आॅक्सिजनबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही रुग्णालयात केवळ तीन-चार तास पुरेल एव्हढाच आॅक्सिजन साठा आहे. त्यामुळे आॅक्सिजन मिळाल नाही, तर या रुग्णांचे काय करायचे, असा यक्षप्रश्न हाॅस्पिटलच्या प्रशासनाला पडला आहे. दरम्यान, अधिकारी, पदाधिकारी या प्रश्नी हतबल झाले आहेत. 

आज सायंकाळी रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या दालनासमोर ठिय्या करून आमच्या रुग्णाचे काय करायचे, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना केला. याबाबत उशिरापर्यंत त्यांच्यात चर्चा सुरूच होती.

दरम्यान, जिल्ह्यात रोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आज 2795 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 153 रुग्णसंख्या झाली असून, 1 लाख 19 हजार 241 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे 21 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 635 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नगरच्या अमरधाममध्ये रोज किमान 30 ते 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. यावरून परिस्थितीची भयानकता दिसून येते. 

आॅक्सिजन पुरवठा सुरळीत होईल ः डाॅ. भोसले

सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी रुग्णांना वस्तुस्थिती सांगून 20 केएल आॅक्सिजन सायंकाळपर्यंत येत असून, रुग्णांची तात्पुरती गरज भागली जाणार आहे. नंतर उद्याही याबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन डाॅ. भोसले यांनी दिले.

आमदार पवार यांच्या प्रय़त्नातून पुरवठा

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला आॅक्सिजनचा पुरवठा तातडीने केला जाणार असून, सायंकाळपर्यंत हे आॅक्सिजन उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT