Uddhav Thackrey.jpg
Uddhav Thackrey.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणा ! मुख्यमंत्र्यांची पंतप्रधांनांना विनंती

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेची भीषणता लक्षात घेता गर्दीच्या राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर केंद्रानेच बंदी घालण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. (Ban public events! Chief Minister's request to the Prime Minister)

महाराष्ट्राला तीन कोटी लसी द्याव्यात, असे आवाहन करतानाच ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा आणि स्वस्त दरात औषधे पुरवण्याची मागणीही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सहा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे.

वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच  राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली.

रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असला, तरी आणखीही कमी होण्याची गरज आहे. फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत, लसी वाया जाण्याचे प्रमाणही कमी केले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, उद्योगांना फटका बसू न देण्यासाठी तशा उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आश्वस्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला ज्यास्तीत जास्त लसींचे डोसेस मिळावे, महत्वाच्या औषधांच्या किमती नियंत्रित कराव्यात तसेच कोविडोत्तर उपचारांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची  केंद्रे सुरु करण्यासाठी केंद्राने मदत करावी अशी विनंती केली.

महाराष्ट्र हे उद्योगप्रधान राज्य असल्याने उद्योगांकडे लक्ष देण्याचे धोरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.कोणत्याही परिस्थितीत यापुढील काळात कोविडमुळे उत्पादनांवर व सेवांवर परिणाम होणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत असून, उद्योगांसाठी कोविडविषयक टास्क फोर्स तयार केला असून, मुख्यमंत्री सचिवालय त्याचे सनियंत्रण करणार आहे, असे ते म्हणाले.

कोरोनामुक्त गावांमुळे वातावरण निर्मिती

राज्यात आम्ही कोरोनमुक्त गावांसाठी स्पर्धा आयोजित करून एक चांगली वातावरण  निर्मिती केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लहान मुलांमधील कोविड रोखण्यासाठी टास्क फोर्स निर्माण केल्याचेही ते म्हणाले. केंद्राने दिलेल्या प्रमाणानुसार विचार करता, संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता भासेल. राज्य २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन नजीकच्या राज्यातून द्यावा, अशी विनंती ठाकरे यांनी केली.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ५३० पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारणे सुरु असून, जिल्हानिहाय ऑक्सिजन व्यवस्थापन नियोजन केले असल्याचेही ते म्हणाले. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा ८ ते १० जिल्ह्यांमध्ये संसर्ग आहे. या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या ८७.९० लाख डोसेस इथे दिल्या आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले, तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT