मुख्य बातम्या मोबाईल

पालघरच्या निवडणुकीत कटुता टाळता आली असती तर बरे झाले असते : फडणवीस 

सरकारनामा ब्युरो

मुंबई:"पालघरमध्ये निवडणूक ज्या पद्धतीने झाली ती क्‍लेशदायक होती. निवडणूक प्रचारात कडवट लढाई झाली. ही कटुता टाळता आली असती तर बरे झाले असते,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपवर विश्‍वास दाखवून राजेंद्र गावित यांना निवडून दिल्याबद्दल मी पालघरच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. पालघरच्या निकालाचा आनंद आहे, पण निवडणूक ज्या पद्धतीने झाली ती क्‍लेशदायक होती. आमच्याच मित्रपक्षाने आमच्याच पक्षाच्या दिवंगत झालेल्या खासदाराच्या मुलाला फोडून घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे लढाई कडवट झाली. ही कटुता टाळता आली असती तर बरे झाले असते. मात्र विजयाने आमच्या पुरता हा विषय संपला आहे. वनगा कुटुंबीय आमचेच आहेत. श्रीनिवास वनगा यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले राहतील.'' 

सरकारमध्ये घटकपक्ष असलेल्या दोन मित्र पक्षांनी अशा पद्धतीने परस्परांविरुद्ध निवडणूक लढवावी का? यावर चिंतन होण्याची गरज आहे, असे सांगून शिवसेनेबरोबर युतीला भाजपने कधीही नकार दिला नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी सांगितले, "" विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी परभणीची आमची जागा आम्ही शिवसेनेला दिली. आपसांत योग्य पद्धतीने चर्चा करून तीन-तीन जागा आम्ही वाटून घेतल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या जागेवर आम्ही उमेदवार उभे केले नाहीत मात्र काही ठिकाणी त्यांनी युती नाही अशी भूमिका घेतली.'' 

विधानपरिषदेच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेने बरोबर युती करणार का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "युती एकतर्फी तर होऊ शकत नाही. आम्ही युतीला तयार आहोत. पण शिवसेनेलाही युतीसाठी चर्चेसाठी पुढे यावे लागेल. चर्चेला भाजपकडून कधीही नकार नाही.'' 

शिवसेना युती तोडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर जाईल काय? असा प्रश्‍न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, ""ज्या पक्षांच्या ध्येयधोरणा विरुद्ध इतके दिवस आम्ही लढलो त्यांच्याबरोबर शिवसेना जाणार नाही असे मला वाटते.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT