Bhiwandi BJP MP Kapil Patil
Bhiwandi BJP MP Kapil Patil 
मुख्य बातम्या मोबाईल

भिवंडीत ५६ पैकी ३० ग्रामपंचायतीत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

शरद भसाळे

भिवंडी  : भिवंडी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींवर भाजपाने निर्विवाद बहूमत मिळविले आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर मात केली आहे. भिवंडीतील अनेक भागात शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले असून, प्रतिष्ठेच्या काल्हेर, शेलार, पुर्णा ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यातील ५६ पैकी ३४ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.

भिवंडी तालुक्यातील ५६  ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील वळ, आलिमघर, निवळी आणि चिंचवली-खांडपे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहमती झाली होती. मात्र, उर्वरित ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका चुरशीच्या मानल्या जात होत्या. भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र आली होती. मात्र, खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले आहे. तालुक्यातील ५६ पैकी ३० ठिकाणी भाजपाला निर्विवाद बहूमत मिळाले. तर आणखी चार ठिकाणी भाजपाला युतीच्या माध्यमातून सत्ता मिळणार आहे.

तालुक्यातील काल्हेर, शेलार या दोन्ही श्रीमंत ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. खा.पाटील यांच्या गावातील दिवे अंजूरमध्येही भाजपाचा झेंडा फडकला. पुर्णा, माणकोली, पिंपळास, झिडके, कुकसे, ओवळी, लामज, लाखिवली, वडघर, डुंगे, जुनांदुर्खी, अंजूर, पिंपळनेर आदी ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तर खारगाव व निंबवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून भिवंडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपाला मतदारांनी पसंती दिली. त्याबद्दल मतदारांचे आभारी आहोत - कपिल मोरेश्वर पाटील, खासदार, भाजपा, भिवंडी
 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT