Roshan Ghate
Roshan Ghate 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजप नगरसेविकेच्या भावाच्या निधनानंतर रुग्णालयात तोडफोड

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रियंका घाटे यांचे भाऊ रोशन घाटे यांचे मध्यरात्री कोरोनाचे उपचार सुरु असतांना निधन झाले. निधनामुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या समर्थकांनी रुग्णालयात तोडफोड करीत गोंधळ घातला. त्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजात काही वेळ व्यत्यय आला.

निधन झालेले रोशन घाटे हे भाजपच्या नगरसेविका घाटे यांचे बंधू तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते किशोर घाटे यांचे चिरंजीव होते. परिसरात सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने येथील क्युरी मानवता कर्करोग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांनाच मध्यरात्री त्यांचे निदन झाले. त्यामुळे संतप्त नातेवाईक व समर्थकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. यावेळी त्यांनी डॅाक्टर तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. डॅाक्टरांच्या वाहनांची तोडफोड केल्याने गोंधळ निर्माण झाला. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज संकलीत करुन पुढील कारवाईसाठी कार्यवाही सुरु केली आहे. 

दरम्यान या घटनेनंतर आज सकाळी वैद्यकीय क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यास नकार देण्यात आला. रुग्णालयांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला. आज दुपारी इंडियान मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी व रुग्णालयाचे संचालक डॅा राज नगरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. या घटनांबाबत प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन कारवाई करावी. अन्यथा वैद्यकीय उपचारांत अडथळे निर्माण होतात, असे सांगितले. 

कोविडचे मोठे आव्हान समाजापुढे आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॅाक्टर्स, परिचारीक व रुग्णालायाचे कर्मचारी काम करीत आहेत. रुग्णांवर योग्य उपचार केले जातात. हे आव्हान व वैद्यकीय आव्हान लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या प्रयत्नांची रुग्णांच्या नातेवाईकांनी दखल घेतली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्यथा वैद्यकीय तज्ञांचे मनोबल कमी होईल. 
- डॅा. राज नगरकर, संचालक, क्युरी मानवता कर्करोग केंद्र.
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT