Ravi Landage .jpg
Ravi Landage .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

रवी लांडगेंचा आक्रमक पवित्रा; आयसीयू न उभारल्यावरुन महेश लांडगेंना केले लक्ष्य

उत्तम कुटे

पिंपरी : अवाच्यासव्वा दराने कोरोना साहित्य खरेदी करून कोरोना सेंटरवर कोट्यवधी रुपयांची नाहक उधळपट्टी केलेले. पिंपरी पालिका प्रशासन आपल्या भोसरी रुग्णालयात काही लाख रुपये खर्चाचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) का सुरु करीत नाही, हे कोडे आहे. असा संतप्त सवाल स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नुकतेच डावलले गेलेले भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी केला आहे.

या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडल्यामुळे झारीतील शुक्राचार्यांनी हे आयसीयू युनिट उभे न करण्याचे कटकारस्थान रचलेले नाही. ना असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर प्रशासनाच्या नथीतून तीर मारला आहे.

समस्त भोसरीकर रस्त्यावर उतरल्याने पालिकेच्या भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव उधळला गेला. तो राग अद्यापही काहींच्या मनात आहे. त्यातूनच या रुग्णालयात अद्याप आयसीयू उभारण्यात आले नाही का हा प्रश्न भोसरीकरांना पडलेला आहे. असा टोला रवी लांडगे यांनी लगावला. झारीतील शुक्राचार्यांना, तर प्रशासन बळी पडले नाही? कोरोनाचा पुन्हा प्रचंड उद्रेक झाल्याने या रुग्णालयात आयसीयूची नितांत गरज आहे, असे सांगत ते उभारले गेले नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

त्यांनी या रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात लढा दिल्याने तो प्रस्ताव तूर्तास प्रशासनाला बासनात गुंडाळून ठेवावा लागला आहे. रवी लांडगे २०१७ ला भोसरीतून बिनविरोध निवडून आलेले आहेत. मात्र, गेल्या चार वर्षात त्यांना कुठलेही पद देण्यात आलेले नाही. स्थायी अध्यक्षपदासाठी त्यांना शब्द देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलण्यात येऊन दुसरे लांडगे म्हणजे भोसरीतीच अॅड. नितीन लांडगे यांना संधी देण्यात आल्याने नेमस्त रवी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी स्थायी सदस्यत्वाचा लगेच राजीनामा देऊन टाकला. तर, आता प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी थेट शहर कारभाऱ्यांवरच निशाणा साधला आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील यांची त्यांनी आज भेट घेऊन निवेदन दिले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात रवी लांडगे म्हणतात, भोसरी रुग्णालय हे संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरलेले आहे. विशेषतः कोरोना काळात या रुग्णालयाचे महत्त्व आणखी अधोरेखित झालेले आहे. तेथे पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार झाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. मात्र, तेथे आयसीयूची कमतरता आहे. त्यामुळे तेथे दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची हेळसांड होत आहे. 

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठविले जाते किंवा त्यांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो. त्यातून त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातो आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. गंभीर कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड  नितांत गरजेचा आहे. परंतु, अत्यंत गरजेच्या या गोष्टीकडे आजतागायत झालेले प्रशासनाचे दुर्लक्ष खेदजनक आहे.

त्यातून प्रशासन तसेच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींबाबत जनतेमध्ये नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. म्हणून प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भोसरी रुग्णालयात तातडीने नव्हे तर युद्ध पातळीवर आयसीयू युनिट सुरू करावे. तसेच या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय महासभेत घेऊन तो कायमचा रद्द करावा आणि पालिकेनेच ते चालवावे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT