Kirit Somayya Teases CM Uddhav Thackeray
Kirit Somayya Teases CM Uddhav Thackeray 
मुख्य बातम्या मोबाईल

करुन दाखवले!....किरीट सोमय्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना खिजवले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : करून दाखविले!!! २ दिवसात १२ डी सी पी चा बदल्या थांबवून दाखविल्या. २ कि. मी. चा बाहेर जाता येणार नाही थांबवून दाखविले, ४००० कोरोना मृत्यू लपवून दाखविले.... उद्धवा गजब तुझा कारभार...असे म्हणत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खिजवले आहे. मुंबईत पोलिस उपायुक्तांच्या झालेल्या बदल्यांना तीन दिवसांत स्थगिती देण्यात आली, त्यावरुन किरीट सोमय्यांनी हे खिजवणारे ट्वीट केले आहे. 

एकीकडे मुंबईत कोरोनाचे संकट वाढत असतानाच शासनातर्फे करण्यात आलेल्या मुंबई पोलिस दलातील १२ पोलिस उपायुक्तांच्या बदल्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून, संबंधित सर्व पोलिस उपायुक्तांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. या बदल्या रद्द होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत 'करुन दाखवले' ही शिवसेनेची टॅगलाईन होती. तीच वापरत किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.

गृहमंत्र्यांनीही केले ट्वीट

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्वीट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालय व गृहखात्याने या बदल्यांना स्थगिती दिल्याचे देशमुख यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

सध्या देशात कोरोनाचे संकट गडद असल्यामुळे यंदा पोलिस दलात कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे सरकारने कळवले होते. कोरोनाशी सामना करताना अनेक ठिकाणी पोलिसांना अनावश्‍यकरीत्या बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहावे लागत आहे. दरम्यान, मुंबईतील या १२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर काही अधिकाऱ्यांनी नवीन ठिकाणी पदभारदेखील स्वीकारला; तर काही अधिकारी नाराज असल्याने त्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नव्हता. त्यानंतर रविवारी (ता. 5) अचानक या बदल्या रद्द करीत सर्व पोलिस उपायुक्तांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले. 

दरम्यान, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त अभिलाष कुमार हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार हा मुख्यालय एकच्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्याकडे सोपवण्यात आला आहे; तर दुसरीकडे परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नियती ठाकरे यादेखील प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार पोलिस उपायुक्त प्रणव अशोक यांच्याकडे राहणार आहे. तसेच दक्षिण मुंबईतील परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची पोलिस मुख्यालयात उपायुक्त अभियान या पदावर बदली करण्यात आली होती; तर त्यांच्या जागी परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त परमजितसिंग दहिया यांची बदली करण्यात आली होती. 

यासोबतच सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलिस उपयुक्त प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ ७ ची जबाबदारी देण्यात आली होती; तर विशेष शाखा- १ चे गणेश शिंदे हे बंदर परिमंडळाचे कामकाज पाहणार होते. तसेच पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर यांच्याकडे सायबर आणि सायबरचे उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याकडे परिमंडळ ११1 ची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे शहाजी उमाप (विशेष शाखा १), डॉ. मोहन दहीकर (गुन्हे शाखा), नंदकुमार ठाकूर (मुख्यालय- १) यांचादेखील या बदल्यांमध्ये समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT