Nitin Raut - Ashish Shelar
Nitin Raut - Ashish Shelar 
मुख्य बातम्या मोबाईल

'सरासरी राज्य सरकार'ने वीज ग्राहकांची फसवणूक केली : आशिष शेलार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''राज्यातल्या वीज ग्राहकांना कोरोना काळातल्या वीज बिलांमध्ये सवलत देण्यास उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नकार दिल्याने भाजप आक्रमक झाला आहे. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला, अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल!,'' असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. 

उच्च व लघुदाब ग्राहकांची वीजबिलांची सुमारे सात हजार कोटींची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोना काळातील आलेली वाढीव बिलांबाबत सवलत देण्याची शक्यता मावळली आहे. थकबाकीदार ग्राहकांना टप्प्या टप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा राहणार आहे.पण तीन वर्षांपासून थकित असलेल्या ग्राहकांकडून तातडीने वसुली केली जाणार आहे. त्यासाठी विजवितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.   

वीजबिलाची वाढलेल्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात वीजबिलांचा भरणा वेळेत न झाल्याने अनेक ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. त्यावर वीज वितरणने वाढीव दराने बिले ग्राहकांना पाठविल्याने ग्राहकांत असंतोष निर्माण झाला होता. आता सरकारच्या नव्या निर्णयाने पुन्हा असंतोष पसरला आहे. 

"सरासरी" विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली. तशीच बनवाबनवी  "सरासरी राज्य सरकारने" वीज ग्राहकांसोबत ही केली, असे आशिष शेलार यांनी ट्वीट करुन म्हटले आहे. राज्य शासनाने लॉकडाउन काळातील वाढीव वीज बिले वसूल करण्याचे आदेश दिल्याने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर आरपारची लढाई करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकाव्दारे दिला आहे.

राजू शेट्टींचीही नाराजी

नुकतेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका होत आहे. वीज बिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय?  नितीन राऊत यांना जर कोणतेही अधिकार नसतील तर पोकळ घोषणा करू नयेत, या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी, असा सल्ला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT