BJP Leader Atul Bhatkhalkar Criticizes Aditya Thackeray over Mumbai Floods
BJP Leader Atul Bhatkhalkar Criticizes Aditya Thackeray over Mumbai Floods 
मुख्य बातम्या मोबाईल

...आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; आदित्य ठाकरेंना भातखळकरांचा टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काल रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या  पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात व ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल  भागात पाणी साचले, उपनगरी रेल्वेसेवांवरही परिणाम झाला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई महापालिकेने या पावसातही पुन्हा मुंबई तुंबवून दाखवली. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच ही वेळ आली आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यासंदर्भात केली आहे. ही टीका करणारा व्हिडियो त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. 

नालेसफाईत टक्केवारी, कोविड सेंटर मध्ये टक्केवारी, खुद्द महापौरांवर आरोप, अशा प्रकारे भ्रष्टाचाराने लडबडलेल्या महापालिकेच्या कारभारामुळेच सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर घालणारी ही परिस्थिती उद्भवली आहे, असे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.  

''यंदाच्या पावसाळ्यात यापूर्वीही किमान दोन ती वेळा मुंबईत असे पाणी तुंबले होते. उपनगरातील रहिवाशांचे असे हाल सुरु असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे उपनगरांचा पहाणी दौरा करायला तयार नाहीत. ते पर्यटनात तसेच ताजमहाल पंचतारांकित हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत. पुराचा फटका बसलेल्या सर्व कुटुंबांना निदान प्रत्येकी दहा हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी मी मागील पुराच्या वेळी केली  होती. ती प्रशासनाने तेव्हा मान्य केली नाही, निदान आतातरी ठाकरे यांनी उपनगरांचा दौरा करून परिस्थितीची स्वतः पहाणी करावी आणि नुकसानग्रस्तांना वरील मदत द्यावी,'' अशी मागणीही भातखळकर यांनी पुन्हा केली आहे.

कालपासून मुंबई व परिसरात सुरु असलेल्या तुफानी पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला असून सर्व शासकीय व खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत १७३ मिलीमीटर पावासची नोंद झाल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्याची माहिती माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

कालपासून सुरु झालेला पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे रेल्वेलाईनसह सर्वत्र पाणी साचले आहे. भेंडी बाजार, नाना चौक, मुंबई सेंट्रल, जेजे जंक्शन, हिंदमाता, काळा चौकी, वरळी सी फेस, माटुंगा अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाब्यात १३८ मिलिमीटर, पूर्व उपनगरात २० तासांत १९६ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरांत २० तासांत १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सुटी जाहीर करण्यात आली असून आवश्यक त्या कामासाठीच घराबाहेर यावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्तांनी केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT