Pravin Darekar
Pravin Darekar 
मुख्य बातम्या मोबाईल

...हे तर सामान्यांच्या जखमेवर मीठ! मंत्र्यांच्या वीज बिल स्थगितीप्रकरणी दरेकर यांची टीका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकीकडे भरमसाट वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. बेस्ट विद्युत उपक्रमाने मंत्र्यांच्या बंगल्यांना गेले काही महिने वीजबिले न पाठवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 

१५ मंत्र्यांच्या बंगल्यांसह एकूण १७ शासकीय बंगल्यांना बेस्टने गेले चारपाच महिने वीजबिले पाठवली नाहीत. दादा भुसे, हसन मुश्रीफ, अमित देशमुख, के. सी. पडवी, संजय राठोड हे मंत्री तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्या बंगल्यांना गेले पाच महिने बिल पाठवले नाही; तर जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब यांच्या बंगल्यांना चार महिने बिल पाठवले नाही, असे नुकतेच अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले आहे.

१५ मंत्र्यांच्य बंगल्यांना वीज बिलेच नाहीत

या प्रकारावर दरेकर यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे. सर्वसामान्य ग्राहक भरमसाट वीजबिलाने त्रासलेला आहे, आधीच आर्थिक विवंचनेमुळे घर कसे चालवायचे हा प्रश्‍न त्याच्यासमोर आहे. अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारे बेस्ट उपक्रम आपल्याच पक्षाच्या बड्या मंत्र्यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे, असाही टोला दरेकर यांनी लगावला आहे.

युती शिवसेनेची मजबुरी होती का?
गेली २५ ते ३० वर्षे भाजपसोबत युती करूनच शिवसेनेचे राजकारण सुरू होते ही त्यांची मजबुरी होती का, असा प्रश्‍नही दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला आहे. अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्याबाबत प्रतिक्रिया देताना ते मजबुरीने बाहेर पडले, किंबहुना आम्हीदेखील मजबुरीनेच एनडीएमधून बाहेर पडलो, असेही वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्या वक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT