Ram Kadam - Hassan Mushriff
Ram Kadam - Hassan Mushriff 
मुख्य बातम्या मोबाईल

...या तर चोराच्या उलट्या बोंबा : राम कदमांची हसन मुश्रीफांवर टीका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष पेटलाय त्यामुळे, आमदारांची नावे नक्की होत नसल्याचे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याने कालच सांगितले. तो असंही म्हणाला की, हसन मुश्रीफांना पक्षात काय चाललंय ते माहीत नसावं? नावे राज्यपालांकडे न पाठवता दोष त्यांनाच द्यायचा? या तर चोराच्या उलट्या बोंबा,'' अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्‍त १२ जागांसाठीच्या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळ करणार आहे. या नावांची उत्सुकता कायम असली तरी त्यावरुन गदारोळ सुरू  झाला आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिमंडळाने दिलेली नावे बाजूला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी कार्यक्रमात सांगितले होते, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.

''माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले.  त्यावेळी कोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने गेले होते. या ठिकाणी काही वेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे दाखल झाले. सांत्वन केल्यानंतरच पाचच मिनिटात त्यांनी राज्यपालांकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांबाबत धाडसी वक्‍तव्य केले होते,'' असे मुश्रीफ म्हणाले होते. 

''मंत्रिमंडळाने १२ नावांची शिफारस केली तरी ही नावे बाजूला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आमदार कोरे तुम्ही काही काळजी करु नका, असा सल्ला या वेळी  पाटील यांनी दिला. मात्र, काही वेळाने  पाटील यांना त् ठिकाणी भैय्या माने उपस्थित असल्याचे ध्यानात आल्यानंतर त्यांनी सारवासारव  केली," असाही दावा मुश्रीफ यांनी केला होता.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT