BJP MLAs turned their backs on MLA Ranjit Patil's agitation
BJP MLAs turned their backs on MLA Ranjit Patil's agitation 
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार रणजित पाटलांच्या आंदोलनाकडे भाजपच्याच आमदारांची पाठ 

सरकारनामा ब्यूरो

अकोला : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची यंत्रसामग्री आलेली आहे. केवळ मनुष्यबळ नाही, म्हणून महागडे साहित्य धूळ खात पडलेले आहे. कोरोनाच्या काळातही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत दुर्लक्ष होत आहे. महाविकास आघाडी सरकार अकोल्यातील आरोग्य क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केला.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी डॉ. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या मोजक्‍या प्रतिनिधींच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. 

अकोला येथे बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यातील काही भागातील रुग्ण नियमितपणे उपचारासाठी येतात. या रुग्णांचे हित लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मनुष्यबळाला मंजुरी द्यावी, यासाठी डॉ. रणजित पाटील यांनी पाठपुरावा केला. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून अकोल्याच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलकडे दुर्लक्ष होत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी अकरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयासोबतच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे निर्माण करण्यात आले आहे. 

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, वित्त विभागाकडून मनुष्यबळाच्या सुधारीत आकृतिबंधाला अद्यापही हिरवा झेंडा मिळालेला नाही. परिणामी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलसाठी आलेली महागडी यंत्रसामुग्री धूळ खात पडलेली आहे. सर्वोपचार रुग्णालयात कोविडच्या काळात दररोज रुग्ण दाखल होत आहेत. अशावेळी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू झाले तर रुग्णांना दिलासा मिळेल.

ही बाब लक्षात घेऊन हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून अकोल्याच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. मोतिसिंह मोहता, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदाणी, नगरसेवक आशिष पवित्रकार, संजय चौधरी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे, अंजली जोशी, सोनल ठक्कर, राजीव शर्मा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपमधील अंतर्गत कलह कायम 

अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हावे; म्हणून सातत्याने मागणी करणारे भाजपचे शहरातील दोन्ही आमदार, जिल्हा व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. या वरून भाजपमधील अंतर्गत कलह अद्यापही शांत झाला नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT