Sheetal Desai .jpg
Sheetal Desai .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

पोहरादेवी येथील शक्तीप्रदर्शनामुळे महिलांनी घेतला शिवसेनेचा धसका 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे मंगळवार (ता. २३ फेब्रुवारी) आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावरुन पोहरादेवी येथे झालेल्या बेमुर्वतखोर शक्तीप्रदर्शनामुळे राज्यातील महिलांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. शिवसेनेत नव्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतरची ही संस्कृती आहे, असा टोला भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल देसाई यांनी लगावला आहे.

अजाणतेपणी किंवा जाणुनबुजून चूक झाल्यावर ती कबूल करून क्षमा मागून प्रायश्चित्त घेणे हेच खऱ्या माणसाचे लक्षण आहे. त्याऐवजी तो मी नव्हेच अशा प्रवृत्तीने प्रसारमाध्यमांनाच दोष देऊन उर्मटपणे शक्तीप्रदर्शन केल्याने नागरिक घाबरणारच, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे. विशेष म्हणजे शिवसेनेचे हे बदललेले रुप प्रामुख्याने महिलांना धडकी भरवणारे असल्याचे देसाई म्हणाल्या.

देसाई पुढे म्हणाल्या की, माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचे आमदार होते. तेव्हा सामान्य महिलांना शिवसेना नेत्यांबद्दल तसेच शिवसैनिकांबद्दल आदर होता. महिला विश्वासाने त्यांच्याकडे कामांसाठी जात असत व त्या विश्वासाला केव्हाही तडा गेला नव्हता. आता तशी हिंमत कोणी दाखवेल का, याबाबत माझ्या मनात शंका आहे. जुन्या काळातले शिवसैनिक आक्रमक होते. आता शिवसैनिकांमधील ती आक्रमकता निघून गेली आहे, ही नवी शिवसेना आहे. 

शिवसेना पहिल्यापासून राडेबाजीसाठी आणि आता भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्त्रियांच्या फसवणुकीचा शिवसैनिकांचा लौकिक यापूर्वी कधीच नव्हता. उलट शिवसैनिक पूर्वी स्त्रीयांचे रक्षण करीत असत, मात्र आता महिलांची फसवणुक ही नवी ओळख शिवसैनिकांना मिळाल्याबद्दल अभिनंदन, अशा शब्दांत देसाई यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. 

दरम्यान, पोहरादेवी येथे बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात आल्याने कायद्याचा भंग झाल्यामुळे मानोरा पोलिस स्टेशन मध्ये मुख्य दहा जनांसह दहा हजार अज्ञात नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ज्या महंतांना नोटीस देण्यात आल्या होत्या त्यांना वगळण्यात आल्याने पोलिसांनी दबावात कारवाई केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोहरादेवी येथील गर्दी केल्या प्रकरणी आयोजक असलेले महंत यांच्यावर गुन्हे दाखल न करता इतर नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना विचारले असता त्यांनी पोहरादेवी येथील महंतांनी आम्हाला मदत केली असल्याचे सांगितले तर वनमंत्री संजय राठोड यांच्यामुळे गर्दी झाली त्यामुळे संजय राठोड यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? असे विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT