Dhule BJP
Dhule BJP 
मुख्य बातम्या मोबाईल

धुळ्यात सतरा वर्षानंतर भाजपचे संजय जाधव पुन्हा सभापती

सरकारनामा ब्युरो

धुळे : महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे संजय जाधव यांची तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी वंदना थोरात व उपसभापतीपदी शकुंतला जाधव यांची आज विशेष सभेत बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सभापतीपदी श्री. जाधव यांना १७ वर्षानंतर पुन्हा विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर ते पहिले सभापती होते.

महापालिका स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर आज निवडीची प्रक्रिया होती. यासाठी सकाळी दहाला महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा झाली. जिल्हाधिकारी संजय यादव पीठासीन अधिकारी होते. आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, समिती सदस्य, अधिकारी उपस्थित होते. प्रथम स्थायी समिती सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. स्थायी समिती सभापतिपदासाठी श्री. जाधव हे एकमेव उमेदवार असल्याने श्री. यादव यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. 

त्यानंतर सकाळी साडेदहाला महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. या दोन्ही पदांसाठीही प्रत्येकी एका उमेदवाराचे अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी श्री. यादव यांनी सभापतिपदी श्रीमती थोरात व उपसभापतिपदी श्रीमती जाधव यांची निवड झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित तीनही पदाधिकाऱ्यांचा पीठासीन अधिकारी श्री. यादव, आयुक्त अजीज शेख यांनी सभागृहात तर खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पदाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन सत्कार केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात व फटाके फोडत आनंद व्यक्त केला.
...
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्थायी समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली. या माध्यमातून पाच वर्षापूर्वी विरोधी पक्षनेता असताना महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधींच्या मालमत्ता, जागा ताब्यात घेण्यासाठी जे प्रयत्न सुरू केले ते काम पुढे नेऊ. पाणीपुरवठा, रस्त्यांच्या समस्याही सोडवू. 
- संजय जाधव, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती.
---
पक्षनेते व पदाधिकाऱ्यांनी जो विश्‍वास व जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, ती पार पाडण्याचा प्रयत्न करुन विश्वास सार्थ ठरवीन. 
- वंदना थोरात, सभापती, महिला बालकल्याण समिती.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT