Chandrakant Patil, Sanjay Raut .jpg
Chandrakant Patil, Sanjay Raut .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

विशेष अधिवेशन लोकसभेचे की विधानसभेचे? चंद्रकांतदादा अन् राऊतांमध्ये जुंपली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल सोमवारी जे वर्णन केले आहे. तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी, आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट केले आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. 

संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना–काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार व या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा, असे पाटील म्हणाले. 

संजय राऊत काय म्हणाले होते. 

कोरोनामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राऊत यांनी ट्विट करुन केली होती. देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळाचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे राऊत यांनी म्हटले होते. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT