Kulkarni- Boraste
Kulkarni- Boraste 
मुख्य बातम्या मोबाईल

तिजोरी भाजपकडेच; शिवसेनेची फक्त वातावरणनिर्मिती 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडविण्यासाठी शिवसेनेचे सदस्य सहलीला गेले. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बरोबर असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेची ही फक्त वातावरणनिर्मितीच ठरली. महाविकास आघाडीत फूट पडली. भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याने स्थायी समिती अर्थात महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच राहणार आहेत. 

महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची बहुमताने सत्ता आल्यानंतर विषय समित्यांमध्येही भाजपचा वरचष्मा राहिला. मात्र, गेल्या चार वर्षांत एका सदस्याने नगरसेवकपदाचा दिलेला राजीनामा व एका सदस्याचे निधन झाल्याने संख्याबळ घटले. त्यामुळे स्थायी समितीवरही नऊपैकी आठ सदस्यांची नियुक्ती करणे अपेक्षित असताना, महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याने शिवसेनेने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यानुसार गेल्या महिन्यात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. आता स्थायी समितीमध्ये भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक असे विरोधकांचे आठ सदस्य आहेत. भाजपकडून स्थायी समितीची सत्ता हिसकावून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. मात्र, ज्या दिवशी सदस्यांची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने आठ सदस्यांची शहराबाहेर सहल घडविली. त्यात मनसेचा आणखी एक सदस्या टूरमध्ये सहभागी झाल्याने भाजपचाच सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेनेही इगतपुरीमध्ये एका हॉटेलमध्ये सदस्यांची सहल घडविली. बरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात शिवसेनेव्यतिरिक्त अन्य सदस्य बरोबर नसल्याची बाब समोर आल्याने महापौर निवडणुकीप्रमाणे भाजपला घाबरविण्याची शिवसेनेची चाल निकामी ठरली आहे.

अन्य समित्यांकडे दुर्लक्ष
तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेने भाजपचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये वाढविला खरा, परंतु महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, शहर सुधार, विधी समितीमध्येही तौलनिक संख्याबळाचा नियम लागू होत असल्याने शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आर्थिक व्यवहार होत असलेल्या स्थायी समितीवरच शिवसेनेचा डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT