BJP's 'Save Maharashtra' movement from today
BJP's 'Save Maharashtra' movement from today 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपचे आजपासून "महाराष्ट्र बचाओ' आंदोलन 

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आजपासून राज्यभर "महाराष्ट्र बचाओ' आंदोलन करणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

ऑडिओ ब्रिजद्वारे झालेल्या या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर व आंदोलनाचे समन्वयक रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. राज्यभरातील पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, विधानसभा प्रभारी आणि मोर्चा प्रमुख या संवाद सेतूमध्ये सहभागी झाले होते. 

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. तर शुक्रवारी (ता. 22) लाखो कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे. 

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र व मुंबईत कोरोनाची समस्या हाताबाहेर गेली, अशी स्थिती आहे. जबाबदारी घेऊन कोण निर्णय घेत आहे, असा प्रश्न पडतो. राज्यात सर्व काही भगवान भरोसे असल्यासारखी स्थिती आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार मिळणे अवघड झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत. गरीबांचे, मजूरांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठाम भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने चिंता करायची आणि राज्याने काहीच करायचे नाही, अशी स्थिती आहे.

सत्ताधारी आघाडीकडून केवळ राजकारण करणे, प्रसिद्धी मिळवणे आणि सोशल मीडियातून आभासी स्थिती निर्माण करणे चालू आहे. वास्तविक स्थिती ध्यानात घेऊन जनतेचे दुःख मांडावे अशी लोकांची अपेक्षा आहे. राजकारण होऊ नये याचा अर्थ जनतेची दुःखे मांडायची नाहीत असे होत नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढून सामान्यांची दुःखे मांडण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची ही वेळ आहे, असे फडणवीस म्हणाले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर होत गेली आहे. या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला सर्वतोपरी साथ देण्यासाठी भाजपाने सरकारवर टीका टाळली होती. पण दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय पक्षाने घेतला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT