uddhav mantarlay
uddhav mantarlay 
मुख्य बातम्या मोबाईल

मला व्हिलन ठरवले तरी चालेल; पण जनतेच्या हिताचा निर्णय घेणार : मुख्यमंत्र्यांचा लाॅकडाऊनचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाला हरविण्याचे आवाहन केले. मात्र कोरोनासाठी काही उपाययोजना केल्या तर त्याचे राजकारण करू नका, असा टोला विरोधकांना लावला. लाॅकडाऊनची प्रत्यक्ष घोषणा त्यांनी केली नाही. पण तो लावण्याचा इशारा राज्याच्या जनतेला आज दिलेल्या संदेशात त्यांनी दिला. उद्योगपती आनंद महिंद्र, भाजपच्या नेत्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला होता. त्याचाही समाचार ठाकरे यांनी घेतला. 

ठाकरे म्हणाले की मार्चपासून राज्यात दुपटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज 45 हजार रुग्ण आढळत आहेत. आपण रोज 1 लाख 82 हजार कोरोना निदान चाचण्या करतो. ही संख्या अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. त्यातील 70 टक्के RTPCR चाचण्या असतील, याची दक्षता घेत आहोत.

लष्करच्या धर्तीवर मोफत हॉस्पिटल उभारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. राज्यात पावणेचार लाख खाटांची सुविधा उभारण्यात आली आहे. मात्र याच वेगाने रुग्णवाढ झाली तर 15 ते 20 दिवसांत या साऱ्या सुविधा अपुऱ्या पडतील. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एका दिवशी तीन लाख लोकांना लसीकरण करण्याची क्षमता आपण गाठली. 65 लाख नागरिकांना आतापर्यंत लसीकरण केले आहे. लशीची पुरवठा वाढला तर रोज 6 ते 7 लाख लोकांना ती देण्याची आपली क्षमता आहे. पण लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे लस घेतली तरी मास्क घालणे आवश्यक आहे.

जगातील इतर देशांनी कशा प्रकारे निर्बंध लादले, याचा आढावा ठाकरे यांनी या निमित्ताने घेतला. अर्थचक्र चालवायचे आहे. रुग्णसंख्याही कमी करायची आहे, याची मला जाणीव आहे. मात्र काही लोक आम्ही लाॅकडाऊन खपवून घेणार नाही, आम्ही विरोध करू, हिटल शाही नको, रोजगाराचे पैसे खात्यात जमा करा,'' असा एका पक्षाने म्हटल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपचा नामोल्लेख टाळला. मला यात राजकारण आणायचे नाही, अस स्पष्टीकरण त्यांनी या वर दिले.ज्या उद्योगपतीने म्हटले आहे की आरोग्य सुविधा वाढवा.  मग मला तज्ञ, बेडस, डॉक्टर पण द्या. ते कुठून आणायचे, असा सवाल त्यांनी केला. हे काही फर्निचरचे दुकान नाही, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली. मला व्हिलन म्हटलं तरी मी जबाबदाऱ्या पार पाडेन, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी कठोर निर्णय घेण्यास कचरणार नसल्याचे सांगून टाकले. 

सगळ्या राजकीय पक्षांना मी हात जोडून विनंती करतो की जनतेशी खेळू नका. आपल्याला अर्थचक्र थांबवायचं नाही. मी आज लाॅकडाऊन जाहीर करत नाही. पण त्याचा इशारा आज देतो आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत चित्र वेगळं दिसले नाही तर नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागतील. पुढील दोन दिवसांत मी तज्ञ मंडळींशी बोलणार आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT