Can't do anything better than this now says agriculture minister
Can't do anything better than this now says agriculture minister 
मुख्य बातम्या मोबाईल

आता यापेक्षा चांगले काही करू शकत नाही; कृषीमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्तावही फेटाळल्यानंतर कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांना शुक्रवारी निर्वाणीचा इशारा दिला. कायद्यांवरील चर्चेदरम्यान कृषीमंत्र्यांसह शेतकरी संघटनांही ठाम राहिल्याने काही मिनिटांतच बैठक संपली. बैठकीदरम्यान कृषीमंत्री शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर भडकल्याचे दिसून आले. तिन्ही कायदे चांगले असल्याचे सांगत त्यांनी यापेक्षा चांगले काही करू शकत नाही, असे स्पष्ट केले.

कृषी कायद्यांवर तोडग्यासाठी शुक्रवारी दुपारी चर्चेची बारावी फेरी झाली. केंद्र सरकारने यापुर्वीच तिन्ही कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसा प्रस्ताव शेतकरी संघटनांसमोर ठेवला होता. पण संघटनांनी हा प्रस्तावही फेटाळून लावला. या संघटना कायदे रद्द करण्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी बैठकीला सुरूवात झाली. कृषीमंत्र्यांनी कायद्यांना स्थगितीचाच प्रस्ताव मांडला. पण शेतकरी नेत्यांना आपली भुमिका कायम ठेवल्याने पुढे चर्चा झाली नाही. काही मिनिटांतच बैठक आटोपती घेण्यात आली. 

'तिन्ही कृषी कायदे योग्य आहेत. सरकारच्या प्रस्तावावर जरूर विचार करा व चर्चा करून निर्णय कळवा. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. चर्चेची पुढची तारीख निश्‍चित नाही' असे सांगून कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर व अन्य दोन्ही मंत्री दुपारी एकच्या सुमारास शेतकऱ्यांसमोर हात जोडून बैठकीच्या दालनातून निघून गेले. दुपारी चारच्या आसपास मंत्री पुन्हा बैठकीच्या दालनात आले व नंतरच्या काही मिनिटांतच बैठकच संपली.

आंदोलन शांततेत चालविल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले. यापुढील आंदोलनही शांततेत राहील व काही विपरीत घटना-दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. आंदोलन संपू नये व ते चिघळत जावे यासाठी काही शक्ती प्रयत्नशील आहेत, असे तोमर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तोमर यांनी कायद्यांना स्थगितीची मुदत दीडऐवजी 2 वर्षांपर्यंतही वाढविण्यास सरकारची तयारी असल्याचे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी सांगितले. राष्ट्रीय किसान कामगार महासंघाचे अध्यक्ष शिवकुमार कक्काजी म्हणाले की, आम्ही कायदे रद्द करण्याची मागणी पुन्हा केली व कायदा दुरूस्तीची तयारी आहे हेच सरकारकडून पुन्हा सांगण्यात आले. सुरवातीच्या जेमतेम 18 मिनीटांनंतर मंत्री दालनातून बाहेर गेले.

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या 58 व्या दिवशी सरकार व शेतकरी नेते यांच्यात विज्ञान भवनात झालेले चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा निष्फळच ठरले. दुसरीकडे शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्‍टर रॅली काढण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र यापूर्वी अनेक बैठकांत दिसले होते तसे सकारात्मक वातावरण आजच्या बैठकीवेळी दिसले नाही. उलट तणाव निर्माण झाला, असा अनुभव शेतकरी नेत्यांनी सांगितला.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT